कर तिकीट देणार नाही असे सांगत वायरी ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्यांना केली मारहाण
मालवण | प्रतिनिधी : किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील ४० जणांच्या महिला पर्यटक ग्रुपकडून दादागिरी, दमदाटी व अतिरेक केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. किल्ले सिंधुदुर्ग येथे वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या विषयावरून वाद भडकला. ५ रुपये कर भरणार नाही असे सांगत महिला पर्यटक ग्रुपने कर वसुली करणाऱ्या दोघा महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग हा वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असल्याने किल्ला दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून ग्रामपंचायतीकडून कर वसूल केला जातो. या कर वसुलीचा स्टॉल सिंधुदुर्ग किल्ल्यात असून त्यावर कंत्राटी पद्धतीने दोन महिला कर्मचारी कर वसुलीचे काम करतात. सातारा येथील पर्यटकांचा ग्रुप किल्ला दर्शनासाठी आला असता स्टॉल वरील महिला कर्मचाऱ्यांनी कर भरण्यास सांगितले पर्यटकांनी कर भरण्यास नकार दिल्याने वाद भडकला. यावेळी त्या पर्यटकांनी दोन्ही कर्मचारी तरुणींना धक्काबुक्की करत मारहाण केली. महिला कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती ग्रामपंचायतीला कळविली. यानंतर किल्ल्यावरून ते पर्यटक व तरुणी होडीतून बंदर जेटी येथे परतल्यावर पुन्हा बंदर जेटी येथे दोन गटात वाद झाला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यावेळी दाखल झाले.
अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी प्राप्त तक्रारी नुसार गुन्हे दाखल केले जातील. असे सांगत कार्यवाही सुरू केली.
मात्र त्यांनंतर दोन्ही गटात पोलीस ठाण्या बाहेर आपसात चर्चा झाली. महिला कर्मचाऱ्यांची माफी मागून तसेच त्या महिला कर्मचाऱ्यांच्या फोनचे झालेले नुकसान भरून देण्याची तयारी पर्यटकांनी दाखवली. आमची चूक झाली. गैरसमजातून हा प्रकार घडला आम्ही हात जोडून माफी मागतो असे पर्यटकांनी सांगितले. अखेर महिला कर्मचारी व कुटुंबीय याबाबत सहमत झाले. त्यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल न होता माफीनामा व नुकसान भरपाई या विषयानंतर वाद मिटला.