मनसेच्या मागणीला यश : कोरोनापासून होती बंद
सावंतवाडी । प्रतिनिधी : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणारी सावंतवाडी मळेवाड गुळदुवेमार्गे आरोंदा भटपावणी ही दुपारी २ ची एसटी कोरोना कालावधीपासून बंद करण्यात आली होती. कोरोनानंतर शाळा महाविद्यालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे त्यामुळे फार हाल होत होते. या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने सावंतवाडी आगारप्रमुख यांच्याकडे ही बस पुन्हा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारेकेली होती.
त्या मागणीला अखेर यश आले असून बुधवारपासून ही एसटी सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
कोरोना काळापासून दोन वर्ष ही बस सेवा बंद करण्यात आली होती. पण शाळा कॉलेज सुरू होऊनही सावंतवाडी आरोंदा भटपावणी एसटी अद्यापही सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे नाहक हाल होत होते. तसेच प्रवाशांनाही समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदर बाब मनसेचे पदाधिकारी राजेश मामलेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी मनसेचे सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क केला व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी आगार प्रमुख बोधे यांची भेट घेत सदर एसटी सुरू करण्याबाबत लेखी निवेदन सादर केले होते. त्याची अखेर दखल घेत बुधवारपासून सदर एसटी बस सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडून व प्रवाशांकडून सदर एसटी सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले गेले.
यावेळी आगारप्रमुख बोधे यांचे मनसेकडून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सदर एसटी सुरू झाल्यानंतर मनसेच्यावतीने चालक व वाहक यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देत स्वागत करण्यात आले. यावेळी म.न.से पदाधिकारी राजेश मामलेकर, निलेश मामलेकर, संतोष सावंत, सूयोग शेटकर, समीर धणें, लतेश जोशी, चैतन्य जोशी, नंदकीशोर शेटकर, तूषार शेटकर, वर्षा शेटकर आदी उपस्थित होते.
Sindhudurg