कुणाल भिडे च्या गायनाने रसिक भारावले

कलांगण ची संगीत मैफल उत्साहात

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील सांस्कृतिक चळवळ जोपासणाऱ्या कलांगण परिवारातर्फे ‘तुका आकाशा एवढा’ या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.पुणे स्थित असलेल्या मूळ देवरुख च्या कुणाल भिडे याने ही मैफिल सजवली.कुणाल भिडे यांच्या गायनाने रसिक भारावले.एकापेक्षा एक अभंग सादर करत कुणाल ने रसिकांची मने जिंकली.जय जय रामकृष्ण हरी या गजराने कुणाल ने गायनाला सुरवात केली.त्यानंतर गायलेल्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा,संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ या अभंगाना प्रेक्षकांनी दाद दिली.रामकृष्ण गोविंद नारायण हरी,मन गोविंद रे गोविंद अशा अनेक अभंगाना टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.अणू रेणीया थोकडा तुका आकाशा एवढा या अभंगाला वन्स मोअर ची दाद मिळाली.कुणाल च्या बहारदार गायकीने मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.मैफिलीमध्ये चिपळूण चे प्रा धनंजय चितळे यांनी केलेले निरूपण लक्षवेधी ठरले.धनंजय चितळे यांनी सगळ्यांचं अभंगाची माहिती देत ओघवत्या भाषेत निरूपण केले.हे वर्ष संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ही मैफल गोळवली येथील प पू गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पाच्या सभागृहात झाली.
कलांगण च्या मैफिलाला उपस्थित राहिल्याबद्दल निबंध कानिटकर यांनी आभार मानले.