आनंदराज आंबेडकर ३० रोजी चिपळुणात

संविधान बचाव यात्रेचे होणार स्वागत

शहरात आंबेडकर यांची जाहीर सभा

चिपळूण (प्रतिनिधी) : दीक्षाभूमी नागपूर येथून सुरू झालेली संविधान बचाव यात्रा ३० नोव्हेंबर रोजी येथे दाखल होत आहे. तिचे ठिकठिकाणी स्वागत होणार असून सायंकाळी ५.३० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बहादुरशेख नाका येथे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे.

याबाबत रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौध्दजन पंचायत समिती, हित संरक्षण समिती, बहुजन समाज पार्टी, कुणबी सेना, बौद्धजन उत्कर्ष समिती, वडार पँथर संघटना, नाभिक समाज संघटना, समता सैनिक दल, संभाजी ब्रिगेड, चिपळूण मुस्लिम समाज, कोकण सिरत कमिटी, मातंग समाज संघटना, परीट समाज संघटना, रोहीदास समाज संघटना, बामसेफ, संत गोरा कुंभार समाज संघटना आदी संघटनांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सुमारे ६० राज्यघटनांचा सखोल अभ्यास, चिंतन, मनन करुन या देशाला संविधान अर्पित केले आहे. ज्या संविधानाने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या विचार सूत्रात गुंफून देशाला समृध्देच्या उंच शिखरावर नेले तेच संविधान बदलण्याची भाषा मनुवादी विचाराचे लोक करीत आहेत. हा धोका ओळखून सर्व समाजातील जाती धर्मातील नागरिकांनी, संविधानवादी विचारसरणीच्या लोकांना एकत्र करण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे.

आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी नागपूर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून ही संविधान बचाव यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणार असून कोकण-रत्नागिरी मार्गे दिनांक ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे जाऊन या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा २९ रत्नागिरी जिल्ह्यात येणार असून राजापूर, लांजा, पाली, रत्नागिरी शहरातून ती ३० नोव्हेंबर रोजी संगमेश्वर, तुरळ, आरवली, असुई, सावर्डे येथे स्वागत स्विकारत चिपळूण शहरात येणार आहे. १ डिसेंबर २०२३ रोजी गुहागर- शृगारतळी, लोटे, खेड येथे स्वागत झाल्यावर ती पुढे मार्गस्थ होणार असल्याचे नमूद केले आहे.