राष्ट्रवादीची नारीशक्ती या विरोधात उतरणार रस्त्यावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेसाठी करणार मदत
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील नाक्या नाक्यावर दारूसह अनेक अंमली पदार्थ विकले जात असूनही याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहेत. त्यामुळे आता या प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार असून प्रसंगी या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे रस्त्यावर उतरुन लढा देऊ, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी दिला.
सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, काशिनाथ दुभाषी, ॲड. सायली दुभाषी, राकेश नेवगी, चित्रा बाबर-देसाई, रिद्धी परब, रोहन परब आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात गेली काही वर्षे नाक्या नाक्यावर दारू तसेच अंमली पदार्थ विकले जात आहेत. एवढेच नव्हे तर काही जणांकडून घरपोच डिलिव्हरी सुद्धा दिली जात आहे. याकडे पोलीस यंत्रणेकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकिकडे बेरोजगारीमुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली असल्यामूळे त्याचा गैरफायदा हे अवैध धंदे करणारे माफिया घेत आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकार थांबणे गरजेचे असून आता यासाठी राष्ट्रवादीची नारी शक्ती आक्रमक होणार असून रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यात ८ हजार ६९ रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू होणारं आहे. यावेळी हे अर्ज भरण्यासाठी युवक-युवतींना आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून पूर्णपणे मदत करणार आहोत. तरी या संधीचा फायदा बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.