भाजपच्या नगरसेविका चांदणी कांबळी यांचे २६ जानेवारी रोजी उपोषण

गॅस स्टेशनच्या विरोधात करणार उपोषण 

ओरोस l प्रतिनिधी :      कुडाळ नगरपंचायत हद्दीतील लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत गॅस साठवणूक करण्यासाठी स्टोरेज हाऊस प्रकल्प उभारला गेला आहे. हा प्रकल्प अडचणीचा ठरत आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही. हा गॅस स्टोरेज हाऊस प्रकल्प लोकवस्ती तसेच वर्दळीच्या जागेतून स्थलांतरित करावा यामुळे भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील प्रकल्प रद्द करावा, अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका चांदणी कांबळी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, हा प्रकल्प पूर्णपणे लोकवस्तीत आहे आणि जवळ जवळ ५० मीटर अंतराच्या आत राहती घरे, जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळा, नाथ पै शाळा तसेच महालक्ष्मी मंदिर आहे. कुडाळ बाजारपेठला महामार्गापासून जोडणारा मुख्य रस्ता आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर ये जा या मुख्य रस्त्याने होत असते. रस्त्यापासून अगदी २ ते ३ मीटर अंतरावर हा प्रकल्प उभारला गेला आहे. या मुख्य मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणूक व नरकासुर दहन या उत्सवा बरोबर लग्न वरात वगैरे नेहमी होत असतात. त्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी वगैरे यामुळे भविष्यात धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

स्थानिक नागरिकांना भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी स्थानिक रहिवासी तसेच लोकप्रतिनिधी तीव्र विरोध केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता हा प्रकल्प या ठिकाणी राबवू नये ही स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथील हा प्रकल्प रद्द करून लोकवस्तीच्या बाहेर स्थलांतरित करावा. तरीही जबरदस्तीने हा प्रकल्प या ठिकाणी राबविला गेल्यास येत्या २६ जानेवारी २०२३ रोजी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी मिळून उपोषणास बसणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.