अंकिता बळी द्वितीय तर नियती परब तृतीय
सिंधुदुर्ग महिला शक्ती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन
कुडाळ । प्रतिनिधी : कुडाळ-बांव येथे आयोजित “महिला सशक्तिकरण कार्यक्रम २०२३” निमित्त घेण्यात आलेल्या पैठणीच्या खेळात सौ. सुजाता सुशांत राणे या विजेत्या ठरल्या. त्यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. तर सौ. अंकिता आनंद बळी व सौ. नियती महादेव परब यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पैठणी जिंकली. दरम्यान सर्व विजेत्या महिलांना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्वामिनी परब यांच्या हस्ते मानाच्या पैठणी बहाल करण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण साठ महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता.
यावेळी उद्घाटक म्हणून गायिका सायली सामंत, उद्योजक संतोष सामंत, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुडाळ पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे, ओरोस सखी वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशक रूपाली प्रभू, बांबुळी महिला उद्योजिका प्रज्ञा सरवटे, बाव सरपंच अनंत आसोलकर, बांबुळी सरपंच प्रशांत परब, राष्ट्रपती पुरस्कार विजेते नीलकंठ परब, सोनवडे सरपंच सौ. नाजूका सावंत, महिला शक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग अध्यक्षा सौ. स्वामिनी परब, महिला पोलीस श्रीमती परब, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रशांत परब, नागेश करलकर, बाव मुख्याध्यापिका प्राजक्ता वालावलकर, सुधीर परब, श्री. मयेकर, दिपश्री राऊत, वैष्णवी राऊत, प्रकाश राणे शरयू सावंत, दिलीप परब, मनोहर टोपले, सुधीर परब, दीपक राऊत, हरिश्चंद्र परब, नागेश करलकर, संदेश सामंत, श्रावण सावंत, राजा चव्हाण, सुधीर सामंत, रवी मांजरेकर, सुधीर राऊत आदींसह मोठ्या संख्येने प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य व गावातील महिला उपस्थित होत्या.
महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने “महिला सशक्तिकरण” हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी उपस्थित महिलांना कायदे व त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर खास आकर्षण असलेला “शुभम क्रिएशन प्रस्तुत” साठ महिलांमध्ये पैठणीचा खेळ रंगला. यात सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला. दरम्यान या खेळात अंतिम फेरीत पूजा बावकर, सारा कदम, मानसी जावकर, अंकिता बळी, नियती परब, समिधा करंगुटकर, स्वराली कुबल, प्रिया करलकर, सुजाता राणे, संजना मयेकर व अस्मिता मांजरेकर आदी महिलांची निवड झाली होती. त्यानंतर रंगलेल्या गुणांकनाच्या सामन्यात सर्वच महिलांमध्ये चढाओढ दिसून आली.
मात्र, अंतिम टप्प्यात सुजाता राणे यांनी २८५ गुण मिळवून मानाची पैठणी जिंकली. तसेच अंकिता बळी यांनी २८३ गुण मिळवत द्वितीय क्रमांकाची पैठणी प्राप्त केली. तर नियती परब यांनी २५३ गुण मिळवत तृतीय क्रमांकाच्या पैठणीवर आपले वर्चस्व राखले. दरम्यान सर्व विजेत्या महिलांना मानाच्या पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर याच कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांसाठी घेण्यात आलेल्या खेळात अनुजा आसोलकर हिने बक्षीस जिंकले. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी व ज्योती ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी हळदी-कुंकुंचाही कार्यक्रम घेण्यात आला.