जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित वैज्ञानिक सहलीतून शैक्षणिक गुणवत्तावाढ

अभ्यास दौर्‍यात विविध माध्यमिक शाळांमधील ३६ विज्ञान शिक्षकांचा सहभाग

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे रविवारी एक दिवसीय वैज्ञानिक सहलीचे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमधील ३६ विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते.

सदर अभ्यास दौऱ्यात पणजी येथील गोवा विज्ञान केंद्र, आयसीएआर व विज्ञान भारती या संस्थांचे सहकार्य लाभले. विज्ञान भारतीचे गोवा विभाग प्रमुख प्रा.सुहास गोडसे यांनी सहभागी शिक्षकांना विज्ञान भारती संस्थेच्या विविध उपकमांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान चित्रपट महोत्सव व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या फिल्म मेकिंग कार्यशाळेबाबत माहिती दिली. भविष्यात या उपक्रमांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील विज्ञान शिक्षकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

गोवा विज्ञान केंद्राचे संचालक प्रा.विलास चौधरी यांनी हवेचा दाब (Atmospheric pressure) या विषयावर कृतियुक्त प्रयोग सादर करुन विविध संकल्पना स्पष्ट केल्या.

केंद्रात मांडणी करण्यात आलेल्या विविध वैज्ञानिक प्रात्यक्षिकांबरोबरच आकाशदर्शन व सजीवांच्या उत्क्रांतीवर आधारित थ्रीडी शोचे आयोजनही करण्यात आले होते. दुपारच्या सत्रातील स्नो वर्ल्ड चा मनमुराद आनंद लुटून संध्याकाळच्या सत्रात किनारी भागातील क्षेत्रभेटीत शंख,शिंपले व मासे इ.समुद्री जलचरांच्या विविध प्रजातींच्या जीवनचक्राविषयी माहिती घेतली. लवकरच वैज्ञानिक संकल्पनाची देवाण घेवाण व दृढीकरण करण्यासाठी

महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक या शेजारी राज्यातील क्रियाशील विज्ञान शिक्षक एकत्र आणण्यासाठी आंतरराज्य फोरम स्थापन करणार असल्याचे मत जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष आर. के. कारेकर, सचिव प्रकाश कानुरकर, सहसचिव संतोष पवार, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, जिल्हा कार्यकारणी सदस्य सत्यपाल लाडगावकर, चंद्रकांत चव्हाण,संजय शेवाळे, मिलिंद गांवकर,अनंत साईल, सतिशकुमार कर्ले तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विज्ञान शिक्षक मंडळाचे प्रतिनिधी शिक्षकांनी या चर्चा सत्रात आपले विचार मांडले.

कणकवली तालुका अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी या अभ्यास दौऱ्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले.

जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्यासह शैक्षणिक संस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.

Sindhudurg