देवरूख : नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाची विद्यार्थिनी लीडिंग कॅडेट अमिषा संतोष केदारी(२ महाराष्ट्र नेव्हल युनिट,) हिची कर्तव्यपथ परेड निवड झाली आहे.महाविद्यालयातून निवड झालेली आमिषा केदारी ही दुसरी विद्यार्थिनी आहे, यापूर्वी राजेंद्र विनोद सावंत याची जानेवारी २०१९च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली होती. यावर्षी अमिषा केदारी हिच्या निवडीमुळे पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयात सन २०१६ पासून नेव्हल एन.सी.सी.चा, तर आर्मी एन.सी.सी.चा आरंभ सन २०१९ मध्ये झाला आहे. अमिषा केदारी हिने इयत्ता बारावी पासून (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) नेव्हल एन.सी.सी. मध्ये सहभाग घेतला. सध्या ती एन.सी.सी.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये, तर महाविद्यालयात प्रथम वर्ष, कला या वर्गात शिकत आहे. महाविद्यालय जून,२०२२ पासून आर.डी.सी. कॅम्पमध्ये सहभाग घेण्याकरता प्रशिक्षण सुरू होते.
पुणे येथे राज्यभरातून आलेल्या ११६ कॅडेट्समधून काटेकोर निवड चाचण्यानंतर तीची निवड करण्यात आली. आर.डी.सी. परेड करता तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. आर.डी.सी. परेड निवडीच्या तयारीसाठी तिला माजी विद्यार्थी कल्पेश मिरगल याचे मार्गदर्शन लाभले. अमिषाने मिळवलेले हे यश प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीने मिळवले असून याचा महाविद्यालयास शहरावासीयांना सर्वांना अभिमानस्पद वाटत असून आमिषाचे यश हे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरणार आहे.अमिषाला कमांडिंग ऑफिसर राजेशकुमार, सब-लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये, सी.टी.ओ. प्रा.सानिका भालेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.अमिषा हि देवरूख न. पं. बांधकाम सभापती संतोष केदारी यांची सुकन्या आहे. अमिषाच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.