पं. आमोद दंडगे यांची २६ ते २९ तालशास्त्र कार्यशाळा रत्नागिरीत

रत्नागिरी : ज्येष्ठ तबला गुरू, लेखक पं. आमोद दंडगे यांची ‘तालशास्त्र’ कार्यशाळा होणार असून त्यांच्याकडून तबला-पखवाज आणि कथ्थक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे. येत्या २६ ते २९ जानेवारीदरम्यान जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर सभागृहात ही कार्यशाळा होईल.
येथील नटराज कथ्थक नृत्य क्लासेस आणि स्वरनिनाद अकादमीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ व २७ जानेवारीला कथ्थक आणि २८ व २९ ला तबला-पखवाज या विषयावर पं. दंडगे मार्गदर्शन करतील. तबलावादनात फर्रुखाबाद घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पं. आमोद दंडगे यांना संगीत, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभला आहे. तबलावादनाच्या विविध पैलूंबद्दल त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच देशभरात अनेक ठिकाणी व्याख्याने, कार्यशाळा झाल्या आहेत. त्यांनी श्रुती सडोलीकर (काटकर), पं. व्यंकटेशकुमार, पं. आनंदबुवा लिमये, पं. पुंछवाले, पं. पंचकृष्णबुवा मट्टीकट्टी, पं. विकास कशाळकर, पं. अरुण कशाळकर, डॉ. राजा काळे, पं. जयतीर्थ मेउंडी तसेच वादक उस्मान खान, शांक-नील, सुधीर फडके, मारुती पाटील (सतार), पं. आनंद मुर्डेश्वर, पं. नित्यानंद हळदीपूर (बासरी), पं. पुरुषोत्तम वालावलकर, पं. मनोहर चिमोटे, डॉ. सुधांशू कुलकर्णी, पं. विश्वनाथ कान्हेरे (हार्मोनियम), प्रदिप बारोट (सरोद) यांच्यासारख्या दिग्गज शास्त्रीय कलाकारांना तबलासाथ केली आहे. तसेच अखिल भारतीय तबला महोत्सव मुंबई, राजर्षी शाहू संगीत रजनी, घराणा संमेलन (कोल्हापूर), गिरीजाताई केळकर संगीत समारोह गोवा, वेणुग्राम संगीत संमेलन बेळगाव, बाळकृष्णबुवा संगीत समारोह इचलकरंजी, सतार संमेलन धारवाड, मोपकर संगीत संमेलन गोवा, सवाई गंधर्व महोत्सव कुंदगोळ, पं. पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन सांगली, उस्ताद आमीर हुसेन खान जन्मशताब्दी महोत्सव मुंबई, रंकाळा महोत्सव कोल्हापूर, नादब्रह्म नागपूर या आणि अशा अनेक संगीत महोत्सवांमध्ये तबलावादन केले आहे. पं. दंडगे हे शिवाजी विद्यापीठातून तबल्यातील ‘मास्टर ऑफ आर्ट्स’ पदवी आणि ‘संगीत अलंकार’ ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त केली आहे.
अशा दिग्गज गुरूकडून तबलावादन मार्गदर्शनाची रत्नागिरीकरांसाठी पर्वणी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी सोनम जाधव, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण यांच्याकडे संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.