रत्नागिरी | प्रशांत दैठणकर : दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा होतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला देश. लोकशाहीत मतदारांचे महत्व सर्वाधिक असे आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य अशी याची संकल्पना आहे अणि यात मतदार केंद्रस्थानी ठेवून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे वेळोवेळी मतदार नोंदणी व मतदार जनजागृती उपक्रम चालविण्यात येतात.
यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करताना महाराष्ट्र निवडणूक आयोगाने एक पुढचं पाऊल ठरेल असा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून याद्वारे आपण वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी अगाऊ नोंदणी करु शकाल.
आपली वयाची 17 वर्षे पूर्ण झाली असतील आणि चालू वर्ष 2023 मध्ये एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबरच्या 1 तारखेला किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण करणार असाल तर आपल्याला मतदार नोंदणीसाठीचा अर्ज क्रमांक 6 भरुन अगाऊ नावनोंदणी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
आपल्या याप्रकारची नोंदणी ऑनलाईन तसेच प्रत्यक्षरित्या करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष नोंदणीसाठी आपण आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जावून अर्ज क्रमांक 6 भरता येईल. यासोबत नव्या पिढीला सोप्या वाटणाऱ्या ऑनलाईन नोंदणीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यासाठी आपण https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी आणि तेथे अर्ज भरुन नाव नोंदणी करु शकता.
सध्या मोबाईल ॲप्लेकेशन अर्थात ॲप वापराचे प्रमाण अधिक आहे. मोबाईलवर आपण सक्षम हे ॲप डॉऊनलोड करुन किंवा voter helpline हे ॲप वापरुन देखील ही नोंदणी करु शकता. वेळ काढून मतदार यादीत नाव नोंदवू
देशाच्या लोकशाही व्यवस्थेत भाग घेऊन मग नवमतदार म्हणून आपण नावनोंदणी करायला सुरुवात करा इतकाच संदेश या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने..