लांजा | प्रतिनिधी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणूनच साईबाबा स्पोर्ट्स अँड सोशल क्लबच्या माध्यमातून अशा पद्धतीने स्पर्धा भरविण्यात आले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिंगेल मनतेरो यांनी लांजा येथे आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये केले आहे.साईबाबा स्पोर्ट्स अँड सोशल क्लब सिंधुदुर्ग शाखा लांजाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा लांजा नंबर ५ येथे चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक २४ जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिंगेल मनतेरो होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर लांजा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विनोद सावंग, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप मुजावर, खरेदी विक्री संघ संचालक संतोष बेनकर, विश्वनाथ मांगले, राजाराम लांजेकर, विष्णू वाघधरे, मुख्याध्यापक विमल चव्हाण, पदवीधर शिक्षक चंद्रकांत पावसकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये चित्रकला स्पर्धा निसर्गाचे चित्र या विषयावर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भूमिका तांबे प्रथम, निषाद पाध्ये द्वितीय, सिद्धी खानविलकर तृतीय तर जीत खोत उत्तेजनार्थ तसेच निबंध स्पर्धा पाणी संपले तर या विषयावर घेण्यात आली होती. यामध्ये श्रेया चाचे प्रथम, मीत करंबळे द्वितीय, निशात पाध्ये तृतीय आणि समीक्षा नाझरे उत्तेजनार्थ असे क्रमांक पटकावून यामध्ये यश संपादित केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने रोख पारितोषिकासह प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आली.या कार्यक्रमाला जयश्री पाटील, प्रकाश बाईत,माणिक कदम, सुरेखा झगडे, वंदना गावडे,क्रांती बेर्डे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.