खेड (प्रतिनिधी) भास्कर जाधव यांना आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने पराभूत करणार असून, भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते रामदास कदम यांनी भरणे येथे बोलताना केले.
तालुक्यातील भरणे येथे शिवसेना नेते रामदास कदम व शिवसेना प्रवक्ते तथा आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, दापोली मतदारसंघातून निवडून येताना आमदार योगेश कदम राज्यातील २८८ मतदारसंघांतील सर्वात जास्त मताधिक्य घेतील तर गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना हरवून या मतदारसंघावर भगवा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला.
ज्यांची ओळख रामदास कदम यांच्यामुळे झाली ते आता आमच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. शिवसेनाप्रमुखांनी स्थापनेपासून कोकणातील जनतेने साथ दिली त्याच कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे यांनी उचलला होता. ज्या शिवसैनिकांनी संघटनेसाठी केसेस घेऊन पक्षाचा पाया रचला त्यांना धुळीस मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या बाळकडूमुळे आम्ही हे कारस्थान हाणून पाडले.
शिवसेना शाखा ही शिवसैनिकांचे मंदिर आहे त्याचा वापर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार होईल, असे
सांगितले. यावेळी नवीन कार्यालयासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आ. योगेश कदम यांना केली.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, सचिव महेंद्र भोसले, सिकंदर जस्नाईक, अरुण कदम, रामचंद्र आईनकर, शांताराम चिनकटे, कुंदन सातपुते, शैलेश कदम, अपर्णा नक्षे, सुप्रिया पवार, मानसी जगदाळे, संजना कुडाळकर, रसिका खेडेकर, सुनील दळवी, जाधव, नीलेश शेठ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील बोरघर, शेल्डी, काडवली पाजवे वाडी आणि असगणी येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.











