देवगडच्या सुपुत्राचा राष्ट्रपती पदकाने सन्मान!

Google search engine
Google search engine

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी संतोष कोयंडे यांची निवड

मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील टेंबवली- कालवी वाडीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलात पो.उप निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संतोष सखाराम कोयंडे यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ७४ पोलीस पदक विजेत्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. १९८८ मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या कोयंडे यांनी आजवर २१३ विविध पदके मिळवली आहेत. यात २०२० मध्ये पोलीस महासंचालकांचे उल्लेखनीय सेवा व अभिलेख चांगला ठेवल्याबद्धलच्या विशेष सन्मान चिन्हाचाही समावेश आहे. आपल्या ३४ वर्षांच्या काळात त्यांनी गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सध्या ते वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असून पुरस्कार जाहीर झाला तेव्हा सुद्धा ते तपास कार्यासाठी दुसऱ्या राज्यात आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९०१ पोलिसांना बुधवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये उल्लेखनीय सेवा ४,शौर्य ३१, तर पोलिस दलामध्ये गुणवत्तापूर्वक सेवा बजावल्याप्रकरणी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. कोयंडे यांचे  वडील सखाराम गणपत कोयंडे हे सुद्धा पोलीस दलाचे निवृत्त कर्मचारी आहेत. संतोष कोयंडे यांच्या या यशाने त्यांच्यावर सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.