भारतातून वेंगुर्लेच्या अथर्व मालजीची निवड
वेंगुर्ले | दाजी नाईक : आयबीएम या कॉम्पुटर क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय कंपनीतर्फे जगभरातून आयोजित केलेल्या “आयबीएम झेड स्टुडन्ट कॉन्टेस्ट” मध्ये भारत देशातून वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावचा सुपुत्र कु.अथर्व बाळकृष्ण मालजी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा जगातील सर्व देशातील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका, युरोप, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका आणि भारत अशा ६ विभागातून प्रत्येकी एक विजेता निवड केली जाते. विजेत्यांना १००० अमेरिकन डॉलर प्राईझ आणि विनर ब्याच दिला जातो. भारतातून कु. अथर्व बाळकृष्ण मालजी याची सलग दुसन्या वर्षी विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सुद्धा भारतातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी होता.
कु. अथर्व हा सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ला-आरवली येथील रहिवासी असून त्याचे शालेय शिक्षण कुडाळ, चिपळूण, बांदा, गोवा-साखळी, शिरोडा अशा वेगवेगळ्या शाळांमधून झाले आहे. सध्या तो फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज रत्नागिरी येथे आयटी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला कॉम्पुटर सॉफ्टवेअर या क्षेत्रात विशेष आवड असून शिक्षणा दरम्यान त्याने विविध आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.