रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात बजेट 2023 वर मार्गदर्शन

Google search engine
Google search engine

येत्या बुधवारी म्हणजेच दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यातील बारकावे, अर्थकारणातील बदललेल्या सुक्ष्म अतिसुक्ष्म घटक समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. देशांतर्गत जेव्हा बजेट सादर केले जाते तेव्हा देशातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत असतो. मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांबरोबरच सर्वसामान्य नागरिकानाही बजेटनंतर होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत, तसेत देशांतर्गत बदलणाऱ्या आर्थिक घडामोडींमधील बारकावे प्रत्येक नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे.

दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दि.2 फेब्रुवारी 2023 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मार्गदर्शन करण्यासाठी सोशो- इकॉनॉमिक तज्ज्ञ, व्यवस्थापन तज्ज्ञ दीपकजी करंजीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने केले आहे. हा कार्यक्रम वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे व्याख्याते दीपक करंजीकर यांची ‘अर्थक्रांतीचा राष्ट्रीय प्रवक्ता’ अशी खास ओळख असून ते सुप्रसिध्द समाजशास्त्र व अर्थतज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि वक्ता आहेत. देशातील ‘सेल्स’ आणि ‘मार्केटिंग टीम्स’ चे नेतृत्व त्यानी केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्पांचे यशस्वी व्यवस्थापनही केले आहे. अमेरिकेत वॉलस्ट्रीटच्या कार्यपद्धती, आर्थिक दहशदवाद, तेल आणि त्याचे राजकारण, अमेरिकन धोरणे, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना यांचा सखोल अभ्यास असून त्याबाबत त्यांनी विस्तृत लिखाणही केले आहे. ‘आजच्या विश्वाचे आर्त’ आणि ‘घातसूत्र’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.अशा अनुभवी तज्ज्ञ व्याख्यात्याच्या खास अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ रत्नागिरीतील वाणिज्य क्षेत्राशी निगडीत व्यक्ती, संबंधीत क्षेत्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच जागृत व सुजाण नागरिकानी घ्यावा असे आव्हान वाचनालयाचे अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी केले आहे.