गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, तेजस्विनी फटकरे यांना पुरस्कार जाहीर

रत्नागिरी: वैद्यकीय मदत निधी न्यास व सिद्धिविनायक गणपती देवस्थान फुणगुस यांच्या संयुक्त विद्यमाने असलेला कै. परशुरामभाऊ महाजन माधवाश्रम व कै. प्रमोदिनी गजानन निमकर स्मृती आरोग्य सेवाव्रती पुरस्कार गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे तर आरोग्य मित्र पुरस्कार तेजस्विनी फटकरे यांना जाहीर झाला आहे.समाजातील सर्व घटकांना वैद्यकीय मदत करण्याच्या दृष्टिने 2001 साली सिद्धिविनायक देवस्थान फुणगुसने वैद्यकीय मदत निधीची स्थापना केली. गेली 21 वर्ष संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदती बरोबरच वैद्यकीय शिबीर, वैद्यकीय माहितीपर व्याख्याने संस्थेमार्फत आयोजन केले जात आहे. यापूर्वी डॉ. नीतू मांडके, डॉ. विकास आमटे, डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. संजय ओक, डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यासारख्या अनेक मान्यवरांना आरोग्य सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अविरत सेवा करणार्‍या डॉ. विवेक भिडे यांची पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे. तसेच सौ. सुनिता व सुरेश राजवाडे पुरस्कृत आरोग्य मित्र पुरस्कारासाठी तेजस्विनी फटकरे यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण शनिवारी (ता. 28) दुपारी 2.30 वाजता श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान, कडेवठार, फुणगुस येथे होणार असून सुप्रसिद्ध संवादक निबंध कानिटकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम डी. पी. म्हैसकर फाउंडेशनने पुरस्कृत केला आहे. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये तर आरोग्य मित्र पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्माचिन्ह व दहा हजार रुपये आहे. सिद्धिविनायक देवस्थान फुणगुसतर्फे धार्मिक कार्यक्रम व वैद्यकीय मदत न्यासातर्फे सर्वांसाठी आरोग्य तपासणी शिबिरही शनिवारी होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वास पुराणिक, प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.