महाराष्ट्रातील पहिले एमकोल युनिट सासोली येथे सुरु
दोडामार्ग । प्रतिनिधी : मीरा क्लिनफ्युएल्स लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युएल्स प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड आणि दोडामार्ग क्लिनफ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सासोली येथे एमकोल युनिटचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दोन्ही कंपन्यांच्या महाराष्ट्रातील या पहिल्या एमकोल युनिटचा
शुभारंभ मीरा क्लिनफ्यूल्सचे डायरेक्टर डॉ. लवेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी एस.एस.के. भारत मॅनेजमेंटचे डायरेक्टर कार्तिक रावल, ॲड. श्यामशंकर उपाध्याय, दोडामार्ग क्लिनफ्युल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर, कॉनबॅकचे मोहन होडावडेकर, रमेश पाटील, निखील ढोकरे, सागर सांगेलकर, राजेंद्र खडगे, वैभव पवार, प्रज्ञा भैरे, दिगंबर रासम, श्री. नाईक, रामा अर्जून सडजी, प्रगती पालंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नेपिअर हत्ती गवतापासून ‘एम कोल’ (नैसर्गिक कोळसा) बनवण्याचे हे युनिट आहे. सासोली गावाच्या १० किलोमीटर अंतरावरील सभासद शेतकऱ्यांचे नेपिअर गवत कंपनी हमीभावाने खरेदी करणार असुन यावेळी उपस्थित शेतकऱ्यासोबत नेपिअर हत्ती गवत लागवडीचे रुपये १०००/- प्रति टन खरेदी करण्याच्या लेखी कराराचा शुभारंभही करण्यात आला. मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी सोबत आतापर्यंत दोडामार्गातील ३७ गावचे ग्राम उद्योजक जोडले गेले असुन एकूण १३८४७ शेतकरी सभासद झाले आहेत.
सासोली गावातील प्लांट मध्ये कर्मचारी कंपनी ऍक्ट नुसार नेमणूक केली जाणार असून तोडणी वाहतूकसाठी ही नोकरदार नेमणूक व वाहन कंत्राट केले जाणार आहेत. रोज १०० टन नेपिअर गवताची या प्लांटला गरज असून त्यापासून एम कोल (नैसर्गिक कोळसा) ३३ टन इतका तयार होणार आहे. मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड कंपनीकडे दररोज ५४००० टन एम कोलची ऑर्डर बुक करण्यात आली आहे.
दोडामार्ग तालुक्यात पूढील एक वर्षात अजून दोन एम कोल चे प्लांट मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व दोडामार्ग
बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभे केले जाणार आहे. यातुन एम कोल हा उत्तम दर्जाचा कोळसा तयार होणार असून याची उष्मांक मूल्य हे अत्यंत दर्जेदार असून त्याच्या पासून कोणतेही प्रदूषण होणार नाही. हा दगडी कोळसा, फरनेस ऑइल, एलडीओला या पद्धतीच्या जीवष्म इंधनाला इकोफ्रेंडली पर्याय उभा रहाणार आहे. एम कोलचे हे युनिट लाईट निर्मिती, फौंड्री व्यवसाय, हॉटेल व्यवसायीक, एमआयडीसी, कापड उद्योग यांच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे. जैव इंधन निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, इकोफ्रेंडली प्रॉडक्ट, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेती उत्पादने असे वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी शेतकऱ्याच्या सोबत जोडली जाणार असून, वार्षिक ३००० कोटीचे शेती उत्पादने निर्मितीचे उद्देश आहे.यावेळी दोडामार्ग क्लिनफ्लुल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर यांनी मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड व दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी मधील व्यवसाय फायद्यातील २०% रक्कम दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी खर्च करणार असल्याचे सांगून या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांना रोजगारासह दोडामार्ग तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.