गुणदे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न
विद्यार्थांच्या कलागुणांना मान्यवरांकडून दाद
खेड | प्रतिनिधी : गुणदे (ता. खेड) येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे शैक्षणिक धोरण नव्या उमेदीचे व नवीन संकल्पना राबवुन समाजोपयोगी विद्यार्थी कसा घडेल यासाठी प्रयत्नशील दिसत असुन संस्थेने घेतलेला हा पुढाकार ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, कोवीडमुळे प्रासंगिक शिक्षण पद्धती बदलली असली तरी आता नियमीत अभ्यासक्रम व अध्यापन सुरु असुन विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे शैक्षणिक आवश्यक साधन गरज म्हणुन न पाहता शाळेतील दिलेला अभ्यास क्रमिक अध्ययन साहित्याचा पुरेपुर वापर करुन आवश्यक तर शिक्षकांकडूनच शंकेचे समाधान करुन केला तर विद्यार्थ्याना नव्या विश्वात भरारी घेता येईल. यासाठी सातत्यपुर्वक ध्यास आणि जिद्द प्रत्येक विद्यार्थ्यानी जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खेडच्या प्रांताधिकारी जयश्री मोरे शिवतरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी केले.
सरस्वती शिक्षण संस्था व अनुदत्त प्रतिष्ठान यांच्या सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय माध्यमिक, गुरुकुल विद्यामंदिर प्राथमिक व मातोश्री अनुसया माई आंब्रे स्मार्ट स्कुल या शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. शाळेच्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस इ. ९ वी मधील विद्यार्थीनी मानसी साळवी हिने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करुन इंग्रजीमध्ये शालेय उपक्रम, शैक्षणिक प्रगती, व शाळा परीसर याबाबत महिती दिली तर इ. ९ वी मधील विद्यार्थीनी सिमरण चाळके हिने ईशपुजनाच्यावेळी अथर्वशिर्ष, देवीस्तोत्र म्हणुन शाळा पोर्च मधील देवघरातील श्री गणेश, सरस्वती व सदगुरु पुजन तसेच दीपप्रज्वलन प्रमुख अतिथींचे हस्ते झाले व मान्यवरांचे रंगमंचाकडे आगमन झाले. यावेळी विद्यार्थांनी रेकॉर्ड डान्स, पारंपरिक गिते, कोळीगीते, योगासने व सुप्त गुण यांचे प्रदर्शन करुन उपस्थित ग्रामस्थ पालक यांचेकडुन वाहवा मिळवली. संस्थाध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी प्रस्तावना व मनोगत व्यक्त करुन शालेय उपक्रम शालेय भौतिक सुविधा व भविष्यातील संकल्प याबाबत माहिती दिली. यावेळी संस्थेच्या वतीने प्रांताधिकारी जयश्री मोरे शिवतरे मॅडम यांनी खेड तालुक्यातील महसुल विभाग व लोकोपयोगी विविध योजनांची अंमलबजावणी करुन काही कालावधीतच खेड तालुक्याच्या लोकाभिमुख अधिकारी म्हणुन प्रसिद्ध झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी जोशी यांनी शालेय व सहशालेय उपक्रमासाठी त्यांच्या कार्यकालावधीत कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातुन विविध साहित्य मिळवुन देण्यास प्रयत्न केला तर सुशिल जोशी यांनी शाळेप्रती ठेवलेला स्नेहभाव व प्रेम याकरीता दोन्ही उभयतांचा एकत्रित शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्था कार्यालयास सोफासेट दिल्याबद्दल प्रशालेचे माझी विद्यार्थी अॅड. अथर्व सुशील जोशी यांचे व विनती कंपनीचे सीएसआर व्यवस्थापक श्री. मेहमान साहेब यांनी सामाजिक बांधिलकीतुन इकोसन संस्थेमार्फत प्रशालेस दिलेल्या मदतीबद्दल याचबरोबर माजी मुख्याध्यापक गुलाबराव रोहिले यांचा संस्थेकडून शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, सहसचिव राजेंद्र दत्ताराम आंब्रे तसेच संचालक विष्णू आंब्रे, राजेंद्र विष्णू आंब्रे, अविनाश आंब्रे, मोहन शिगवण, सुनिल मोरे, विलास आंब्रे तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव व अनुदत्त प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सरस्वती शिक्षण संस्थेचे संचालक व अनुदत्त प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय आंब्रे, गुणदे गावचे सरपंच रविंद्र आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.