मालवण । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक चळवळीचे प्रणेते हरिहर महादेव नाचणोलकर (९३) यांचे मालवण येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांचे मूळ गाव नास्नोळा गोवा बार्देश हे होते. हरिहर नाचणोलकर यांनी सिंडिकेट बँक मध्ये २८ वर्षे सेवा केली होती. कसाल, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी ते कार्यरत होते. निवृत्ती नंतर ते मालवण येथे आपल्या गावी स्थायिक झाले होते.सन १९८७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक चळवळीची बिजे त्यांनी रोवली. १९८७ साली मुंबई ग्राहक पंचायतचे माधव मंत्री यांच्या सहकार्याने सर्वप्रथम सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे पहिली बैठक त्यांनी घेतली व त्या नंतर ग्राहक पंचायतची काम सुरु केले. अनेक ग्राहकांना न्याय देण्यासाठी ते स्वतः ग्राहक न्यायालयात जवळ जवळ १५ ते १६ वर्षे केसीस चालवत असत. कितीतरी प्रकरणात त्यांनी ग्राहकांना न्याय मिळवून दिला आहे.
अनेकांनी त्यांचे मार्गदर्शन व सल्ला लाभला आहे, ते प्रचंड न्यायनिष्ठूर होते, शिस्तप्रिय व सडेतोड व्यक्तीमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. मालवण तालुक्याच्या होमगार्ड इन्चार्ज पदीही त्यांनी काम केले होते.लोक त्यांना हरिभाऊ म्हणून हाक मारत असत. ते याच नावाने प्रसिद्ध होते, हरिभाऊ एक अत्यंत बुद्धीवान व कायदेपंडित म्हणून ते ओळखले जात. त्यांचा त्याकाळात सोबत्यांत दरारा होता. आयुष्यभर कोणत्याही गोळ्या औषधांची त्यांना सोबत लागली नाही. ते शेवट पर्यंत निरोगी राहिले. चारपाच दिवसापूर्वी ते घरात पाय घसरुन पडले होते. हेच निमित्त ठरले व त्यातच त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून, दोन नाती व तीन मुली जावई नातवंडे पणतवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर व डॉ. पुजा मालपेकर यांचे ते वडिल होते.