बुलढाणा येथील राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत रत्नागिरीच्या साक्षी जड्यालला सुवर्ण पदक

रत्नागिरी : बुलढाणा येथे आज झालेल्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या साक्षी जड्यालने सुवर्ण पदकाची कमाई केली.

महाराष्ट्र ॲथलेटीक्स असोसिएशन आयोजित बुलढाणा येथे राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली. १६, १८, २० आणि पुरुष – महिला गटात ही स्पर्धा झाली. रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचा ९ जणांचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता.

२० वर्षाखालील गटात साक्षी जड्यालने २२ मिनिट ५९.२३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले. नागपूरक्या मिताली भोयरने दुसरा तर सांगलीच्या सानिका रुपनारने तिसरा क्रमांक पटकावला. गतवर्षी साक्षीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

साक्षीच्या या कामगिरीमुळे तिची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

तिच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांनी अभिनंदन केले आहे.