पिवळ्या व इतर रंगाच्या कलिंगड लागवडीचा प्रयोग करावा; कृषी अधिकाऱ्यांना सूचना
गुहागर | प्रतिनिधी : पुढील वर्षी या प्रकल्पाच्या क्षेत्रात वाढ करण्याच्या व लाल रंगाच्या कलिंगडाव्यतिरीक्त पिवळ्या व इतर रंगाचा गर असलेल्या कलिंगडाचा तसेच वेगवेगळ्या आकाराचे कलिंगड उत्पादीत करण्याचा प्रयोग पुढील वर्षी करावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांना केली.
कृषी विभाग,पंचायत समिती, गुहागरच्या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाटपन्हाळे येथील कलिंगड उत्पादक शेतकरी श्री.तेजस तेलगडे व श्री. तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवडीला जि. प. रत्नागिरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आवर्जून भेट देऊन पं.स.कृषी विभाग व शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते कलिंगड तोडणीचा शुभारंभही करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार हे विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गुहागर दौऱ्यावर आले असताना पाटपन्हाळे येथील कलिंगड उत्पादक शेतकरी तेलगडे यांच्या कलिंगड लागवडीला भेट दिली.
तीन महिन्याच्या कमी कालावधीतील ‘कॅश क्राॅप’ असलेल्या कृषी विभाग,पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कलिंगड लागवडीच्या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुजार यांना यावेळी दिली.
यावेळी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई ,गट विकास अधिकारी प्रशांत राऊत , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर ,सरपंच विजय तेलगडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य पुजा पागडे साहेब , कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्राम विकास अधिकारी श्री.बागूल व इतर अधिकारी यांच्या सह शेतकरी तुकाराम तेलगडे,तेजस तेलगडे उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कलिंगडाचा आस्वादही घेतला. गुहागर चिपळूण रोडवर पाटपन्हाळे येथे कलिंगड विक्री केंद्रालाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुजार यांनी भेट देऊन तेलगडे यांना शुभेच्छा दिल्या.