७० हजार रुपयांचे किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत
रिक्षा व्यवसायिकावर अभिनंदनाचा वर्षाव
लांजा | प्रतिनिधी : रिक्षात हरवलेले ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत करणाऱ्या लांजातील रिक्षा व्यावसायिक जाफर कालसेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा येथील नारकर मैदानावर आकांक्षा महोत्सव सलग सहा दिवस आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातून परत असताना आकांक्षा महोत्सवाच्या आयोजक तथा शिवसेना शहर प्रमुख गुरूप्रसाद देसाई यांची कन्या माऊली गुरुप्रसाद देसाई ही रिक्षाने घरी येत असताना तिचे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट हे रिक्षा चालक जाफर कालसेकर (राहणार कॉसमॉस कॉम्प्लेक्स लांजा) यांच्या रिक्षात पडले होते. यानंतर काळसेकर यांनी तीन ते चार रिक्षा भाडे मारले असल्याने त्यांनाही रिक्षात सापडलेले ब्रेसलेट नेमके कोणाचे आहे याचा अंदाज येत नव्हता. मात्र ब्रेसलेट हरवल्याची माहिती माऊली हिने वडील गुरुप्रसाद यांना दिल्यानंतर गुरुप्रसाद देसाई यांनी शिवसेना उपशहर प्रमुख बाबू गुरव तसेच त्यांचे भाऊजी तथा रिक्षा व्यवसायिक प्रभाकर उर्फ बाबू बोडस,सुरेश लाड यांना याबाबतची माहिती दिली
त्यानंतर त्यांनी रिक्षाव्यवसायिक जाफर कालसेकर यांच्याशी मुबीन काझी यांच्या माध्यमातून संपर्क साधला असता जाफर कालसेकर यांनी आपल्याला ब्रेसलेट रिक्षामध्ये सापडल्याचे सांगून ते गुरुप्रसाद देसाई यांना गुरुवारी२ फेब्रुवारी प्रामाणिकपणे परत केले.अशाप्रकारे सध्या प्रामाणिकपणा लोप पावत चालला असतानाच जाफर कालसेकर यांनी रिक्षात सापडलेले हे हजारो रुपये किमतीचे, सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे राजू धावणे तसेच रिक्षाव्यवसायिक प्रभाकर बाबू गुरव सुरेश लाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गुरूप्रसाद देसाई यांनी या रिक्षा व्यावसायिक जाफर कासेकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विशेष कौतुक केले आहे.