रोटरी क्लब व नगरपंचायत यांचे आयोजन
वैभववाडी | प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि नगरपंचायत वाभवे – वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत वैभववाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांचे मार्फत दोन दिवसांचा रोटरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद आणि जनतेची मागणी यावरून यावर्षी हा महोत्सव रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचा करण्यात येणार आहे.
या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे रस्सीखेच स्पर्धा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. महिलांकरिता सौंदर्य स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांचे ग्रुप डान्स असणार आहेत. जिल्ह्यातील लोक परंपरा व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था आणि आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने सर्व लहान मोठ्या उद्योजकांना आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध होणार आहेत. महोत्सवात विविध घरगुती, मालवणी, कोल्हापुरी, पंजाबी खाद्यपदार्थांची मांदियाळी असणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे प्रेसिडेंट संजय रावराणे आणि वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सन्मा. कु. नेहा माईंनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैभववाडी नगरपंचायत येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे माजी अध्यक्ष रोटे. संतोष टक्के, सेक्रेटरी रोटे. प्रशांत गुळेकर, रोटे. विद्याधर सावंत तसेच वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सन्मा. संजय सावंत वित्त व बांधकाम सभापती सन्मा. विवेक रावराणे आदी उपस्थित होते.












