गोपुरी आश्रम येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नेतृत्व विकास शिबीर

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कणकवली | प्रतिनिधी : नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे जिल्हास्तरीय युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पार पाडले जाणार असून शिबीर निवासी स्वरूपाचे असेल. १५ ते २९ या वयोगटातील युवक-युवती या शिबिरात सहभागी होऊ शकतात. शिबिरार्थींना भारत सरकारचे प्रमाणपत्र व प्रवास खर्च दिला जाणार आहे.

नेहरू युवा केंद्रामार्फत युवकांच्या नेतृत्व विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असतात. या जिल्हास्तरीय शिबिरातून युवकांना व्यक्तिमत्त्व विकास, कायदेविषयक माहिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची माहिती, सायबर गुन्हे, पर्यावरण बदल, लिंग समानता, युवा मंडळ स्थापना व सामाजिक विकास, मैत्री, प्रेम व आकर्षण, LGBTQ समुदायाचे प्रश्न, संविधान याविषयी तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, योगा, श्रमदान, चर्चा, शॉर्ट फिल्म आणि विविध खेळांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत आपला सहभाग कशाप्रकारे असावा, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अयोजकांमार्फत करण्यात आले आहे. शिबिर निवासी स्वरूपाचे असल्याने शिबिरार्थींनी आवश्यक ते साहित्य सोबत आणायचे आहे. अधिक माहितीसाठी विश्वराज विकास सावंत 97634 35712 (यारा फाउंडेशन) आणि सुजय जाधव 77961 83879 (नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय युवा स्वयंसेवक) यांच्याशी संपर्क साधावा.