अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात ६ फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा उत्सव !

पालखी सोहळ्यात दिंडी पथकांचा सहभाग

मसुरे | झुंजार पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ६ फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. या निमित्त पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती, सकाळी ०८:३० वाजता ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते गुरूजी मोहनराव पुजारी व मंदार महाराज व सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात देवस्थानचे रूद्राभिषेक, ११:३० वाजता महानैवेद्य आरती संपन्न होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने भक्तनिवास येथील भोजन कक्ष येथे भोजन महाप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक, साऊथ पोलीस स्टेशन समोरून मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरू मंदीर मार्गे भारत गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्लीतून वटवृक्ष मंदिर अशा पालखी मार्गाने भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा परंपरेनुसार संपन्न होईल. या पालखी सोहळयात लातूर, उस्मानाबाद जिल्हयातील दिंडी पथकांचा समावेश असेल. रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा पुन्हा वटवृक्ष मंदिरात विसावेल आणि पारंपारिक भजन सेवा होईल. यानंतर देवस्थान समितीकडून शिरा प्रसाद वाटप होवून श्री गुरूप्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल. तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांच्या दर्शनाचा भोजन महाप्रसादाचा व पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखी सोहळा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.