राजापूर पत्रकार संघाचा आदर्श वैद्यकिय सेवा पुरस्कार उन्हाळेचे डॉ. अजित जोशी यांना जाहीर

प्रगतशिल शेतकरी पुरस्कार सौंदळचे वासुदेव घाग

आदर्श शिक्षक पुरस्कार ससाळेच्या सौ. रोशनी मोहिते

आदर्श संस्था पुरस्कार बज्मे उर्दु आदब राजापूर

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार बुधवारी जाहिर करण्यात आले आहेत. यावर्षीचा आदर्श वैद्यकिय सेवा पुरस्कार ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही रूग्णांना दर्जेदार सेवा देणाऱ्या उन्हाळेचे डॉ. अजित जोशी यांना तर प्रगतशिल शेतकरी पुरस्कार सौंदळचे वासुदेव घाग यांना आदर्श शिक्षक पुरस्कार ससाळे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. रोशनी मोहिते यांना जाहिर झाला आहे. तर आदर्श संस्था पुरस्कार राजापूर शहरात नॅशनल इंग्लीश स्कुल ही इंग्रजी माध्यम शाळा चालविणाऱ्या बज्मे उर्दु दब राजापूर संस्थेला जाहिर झाला आहे.

शनिवारी ६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, याचे औचित्य साधून राजापूर पत्रकार संघाच्यावतीने शनिवार दि. ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

राजापूर पत्रकार संघ राजापूरच्या वतीने गेली पंधरा वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संघाच्या वतीने दरवर्षी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व शेती क्षेत्रात उलेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाते.

बुधवारी झालेल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत या पुरस्कारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, सचिव राजेंद्र बाईत, सहसचिव-प्रकाश नाचणेकर, खजिनदार शरद पळसुलेदेसाई, सदस्य महेश शिवलकर, विनोद पवार, संतोष मोडे, संतोष शिंदे, राजेंद्र जोगले आदी उपस्थित होते.

फोटो-डॉ. अजित जोशी, वासुदेव घाग, रोशनी मोहिते