कुडाळ | प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीत श्री अविनाश गंगाधर पराडकर यांची भाजपाच्या प्रदेश प्रवक्ता पदी नियुक्ती घोषित करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती घोषित केल्यानंतर प्रदेश कार्यालय सचिव श्री मुकुंद कुलकर्णी यांनी यासंबंधी अधिकृतरित्या पत्राद्वारे प्रसिद्धीमाध्यमाना कळवले आहे.
अविनाश पराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सोशल मीडियाची बुलंद तोफ म्हणून त्यांनी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून काम पाहीले होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची सोशल मीडिया संयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अविनाश पराडकर यांना प्रदेशात मोठी जबाबदारी देण्यात येईल असे संकेत दिले होते. पुढील महिनाभरात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वॉररूमच्या संयोजक पदी अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा महाराष्ट्रचा वॉररुम सक्षम बनवण्यासाठी त्यांचे पूर्णवेळ योगदान आहेच. त्याचबरोबरीने आज नरिमन पॉईंट मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अविनाश पराडकर यांची प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या पदावर सिंधुदुर्गच्या सुपुत्राला स्थान मिळाल्याने जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.