मंडणगड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात “बँकिंग क्षेत्रातील संधी आणि बँक बडोदाच्या सुविधा” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बँक ऑफ बरोडा, मंडणगड शाखेचे व्यवस्थापक श्री. सुरज खेतमाळस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीएससी आय टी चे विभागप्रमुख सहा. प्रा. राजेंद्र राऊत यांनी श्री. सुरज खेतमाळस पुस्तक देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सूरज खेतमाळस म्हणाले की, ” देशात सध्या 26 राष्ट्रीयीकृत बँका आहेत आणि या बँकांमध्ये विविध पदांसाठी हजारो करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. येत्या काही वर्षांतही हे चित्र कायम असेल. या बँकामध्ये वेळोवेळी विविध पदांसाठी भरती होत असते. प्रामुख्याने लिपीक पदे व प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होते. त्याचप्रमाणे लॉ ऑफिसर्स, आय.टी. ऑफिसर्स, क्रेडिट ऑफिसर्स, सुरक्षा अधिकारी, ग्राहक संपर्क अधिकारी, हिंदी भाषा अधिकारी इ. पदांसाठीदेखील भरती होते.” पुढे ते बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी आयबीपीएस परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खुशी खैरे तर कु. आभार प्रणय कदम या विद्यार्थ्यानी केले. यावेळी कार्यशाळेस सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.