जेष्ठ साहित्यिक प्रविण बांदेकर यांचा नागरी सत्कार!

विवीध संस्थांनीही केला सत्कार

दोडामार्ग | सुहास देसाई : कोकणाला बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांसारखी महनीय व्यक्ती लाभल्या. यानी आपल्या कामातून वेगळा ठसा निर्माण करून संसद गाजवली होती. त्यांनी आदर्श निर्माण केला त्यातून अनेकांना आजही प्रेरणा मिळते . दोडामार्गातूनही अनेक उर्जादायी व्यक्तिमत्व होऊन गेली आहेत. तुमच्यातीलच कोणीतरी पुढे येणे गरजेचे आहे. अंतर्मुख होऊन स्वतःचा व समाजाचा विकास करावा असे आवाहन राष्ट्रीय स्तरावरील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक प्रविण बांदेकर यांनी केले आहे.दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेटये यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रविण बांदेकर यांना शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विवीध संस्थांनीही त्यांचा सत्कार केला यावेळी व्यासपीठावर पानवळ-बांदा गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, स्वातंत्र्यसैनिक भाई परमेकर, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकर, डॉ. हेमंत पेडणेकर, दोडामार्ग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लवू मिरकर, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष सुहास देसाई, रोटरी क्लबचे भूषण सावंत उपस्थित होते.

श्री. बांदेकर बोलताना पुढे म्हणाले, विद्यार्थी वयातच आपल्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. याचा भविष्यात नक्की फायदा होतो. लहान वयात मला माझ्या शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. त्यांनी माझ्यातील सुप्त गुण ओळखून त्याची मला जाणीव करून दिली. माझ्यावर प्रेम करणारी आणि माझ्या साहित्याविषयी आस्था दाखवणाऱ्यांबद्दल मला खूप मोठा आदर आहे. आजचा हा सत्कार माझ्या मातीतला आहे‌ हा क्षण आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा असतो, असे भावोद्गार ज्येष्ठ साहित्यिक बांदेकर यांनी काढले.खेड्यांमध्ये शिक्षण देणे ही एकदम कठीण गोष्ट असते. येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या पराकाष्ठाने धडपड करून शिक्षण घेतले आहे. विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यावर या महाविद्यालयाची जाण ठेवावी. समाजातील थोर व्यक्तींचा आदर्श घ्यावा. यातुन खुप मोठी प्रेरणा मिळते व आपले आयुष्य बदलते, असा मौलिक सल्ला डॉ. गोविंद काजरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच इतर मान्यवरांनीही भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय खडपकर यांनी केले.