मोरया बांदा संघ ठरला उपविजेता
‘सावंतवाडी प्रीमियर लीग’ भव्य क्रिकेट स्पर्धा ठरली यादगार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
डीजेचा थरार, देवगड येथील ढोल ताशा पथकाची धून, फटाक्यांची आतषबाजी व बक्षिसांची खैरात यांसह हजारो क्रिकेट रसिकांची उपस्थिती या पार्श्वभूमीवर पार पडलेली युवा जनसेवा संघ निरवडे आयोजित निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ अर्थात सावंतवाडी प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा समस्त क्रिकेट रसिकांसाठी यादगार ठरली. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोरया बांदा संघावर एकतर्फी विजय मिळवत सातेरी नेमळे संघाने निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर मोरया बांदा संघ उपविजेता ठरला.
नो चान्स कारिवडे संघ तृतीय तर जय माऊली तिरोडा संघ चतुर्थ बक्षिसाचा मानकरी ठरला. तर संपूर्ण स्पर्धेत आपल्या बहारदार तूफान खेळीने क्रिकेट रसिकांची मने जिंकणारा सातेरी नेमळे संघाचा अरविंद नेमळेकर मालिकावीर ठरला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोरया बांदा संघाने मर्यादित ५ षटकांमध्ये ६ गडी बाद २८ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल २९ धावांचे आव्हान स्वीकारून फलंदाजीस उतरलेल्या सातेरी नेमळे संघाने केवळ ३.५ षटकांत ६ गडी बाद २९ धावा फटकावित लीलया विजय संपादित करीत हा संघ सावंतवाडी प्रीमियर लीगचा मानकरी ठरला.
विजेत्या सातेरी नेमळे संघाला मान्यवरांच्या हस्ते ‘निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी’ व श्री मुळपुरुष मंदिर बांदिवडेकरवाडी पुरस्कृत रोख ७५ हजार रुपये बक्षिस देवून गौरविण्यात आले. उपविजेत्या मोरया बांदा संघाला भव्य उप विजेताचषक व युवा जनसेवा संघ पुरस्कृत रोख ५० हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तर तृतीय पारितोषिक विजेता नो चान्स कारिवडे संघ व चतुर्थ पारितोषिक विजेता जय माऊली तिरोडा संघाला भव्य चषकांसह तिसरे (रेनबो हिल्सचे प्रोप्रायटर तथा बांधकाम व्यावसायिक शशिकांत पेडणेकर पुरस्कृत १० हजार रोख ) बक्षीस प्रत्येकी ५००० विभागून देण्यात आले. स्पर्धेचा मालिकावीर अरविंद नेमळेकर ( सातेरी नेमळे ), उत्कृष्ट फलंदाज सागर मोरये ( मोरया बांदा ), उत्कृष्ट गोलंदाज सिद्धेश मोरये ( मोरया बांदा ), उत्कृष्ट यष्टीरक्षक ऋषिकेश कोरगावकर ( डंकल प्रस्ताव ) तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिद्धार्थ परब ( जय माऊली तिरोडा ) यांनाही रोख पारितोषिक तसेच आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह वास्को गोवाचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर, गोवा चिकलीम येथील सरपंच कमला प्रसाद यादव, प्रसिद्ध कायदे तज्ञ ॲड. अनिल निरवडेकर, मडगाव प्रिन्सिपल कौन्सिलर तथा दक्षिण गोवा पीडीए डिरेक्टर गिरीश बोरकर, निरवडे सरपंच सौ. सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तथा निरवडे चे माजी सरपंच प्रमोद गावडे, मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, चिकलीम ग्रामपंचायत सदस्य, दिपक बांदिवडेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, भरत बांदिवडेकर, बाबल सावळ, प्रभाकर बांदिवडेकर, संजय तानावडे, युवा कार्यकर्ते दिनेश पेडणेकर, बाबल मयेकर, साई तानावडे, भुषण बांदिवडेकर यांसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी या भव्य दिव्य अशा निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ अर्थात सावंतवाडी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांच्या हस्ते करण्यात आले. पाच दिवस चाललेल्या या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेत अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवित मंडळाला तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यात खासदार विनायक राऊत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच तसेच विविध स्तरातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या नीटनेटक्या व दिमाखदार आयोजनाबाबत उपस्थित सर्वच मान्यवरांनी मंडळाचे तोंड भरून कौतुक केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवा जनसेवा संघ निरवडेच्या तमाम पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमधून शिल्लक राहिलेल्या रकमेतून मंडळाच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात निरवडे पंचक्रोशी साठी भव्य अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. एकंदरीतच १ फेब्रुवारीपासून ते ५ फेब्रुवारी पर्यंत चाललेली ही दिमाखदार व भव्य क्रिकेट स्पर्धा क्रिकेट रसिकांसाठी यादगार ठरली.
Sindhudurg