तळेरे गावचे लेखक-पत्रकार -रमण माळवदे

Google search engine
Google search engine

Writer-journalist of Talere village -Raman Malvade

सिंधुदुर्गचे माणिकमोती-(१४०)
————————————-

डाॕ.बाळकृष्ण लळीत.
(9665996260)
—————————————
ठाणे
दि.१२-०२-१९९६.

प्रिय प्रा.लळीत,
तुम्ही अगत्यपूर्वक पाठवलेलं पुस्तक मिळाले. पुस्तक आवडले. मुखपृष्ठही डोळयांत भरणारं आहे. बोलीभाषेचा मनःपूर्वक अभ्यास करणं ही गोष्ट कठीण आहे. तुम्ही तो केला आणि करता आहात याचा अभिमान वाटतो. वयपुरत्वे त्याचं कौतुक न करणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल. वस्रहरणाने ‘मालवणी भाषेला जनमानसात मान्यता मिळाली, तिला बहर आला. मात्र
मालवणी मुलखातले काही हृद्य नमुने, खंत वाटेल अशी नैसर्गिक स्थिती रसिकांसमोर अजूनही पूर्णपणानं कुणी उभी केलेली दिसत नाही. उपजत विनाद बुद्धी चौकसपणा आणि नाविन्याची आस आपल्याकडील माणसांना अधिक आहे.मात्र कलाकृतीत (बन्हंशी ) त्याचं विकृत स्वरूप भडकपणे साकार होताना दिसतं.
मीही कोकणच्या मातीत सोळा वर्षे होईपर्यंत काढली. आता छपन्नीला पोचल्यावर ‘मालवणी’ एवढा ( सर्वार्थाने)हुशार माणूस मला क्वचितच आढळतो.. असे लक्षात येतं.
‘महाराष्ट्र टाईम्स’मधील सतीश होते ते तुमचे कोण ?
सध्या नेमकं काय करत अहांत ? ‘शिवण्यापासून लिवण्यापर्यंत’ हे माझं पुस्तक वाचनात आहे का? पुण्याला रसिक साहित्य – परेश एजन्सी मध्ये आहे.
केवळ नाईलाज झाला नाहीतर आळंदीला यायचं होतं. भेटीचा योग येवो, लोभ आहे, तो वाढावा.
स्नेहांकित
रमेश माळवदे.
++
‘अनसूया’ मंगला समोर, ठाणे (पूर्व) ४००६०३. दूरध्वनी ५४०४७८० असा निवासाचा पत्ता असलेले रमण माळवदे यांचे मला आलेले हे पहिले पत्र.
कधी-कधी मी एकटा असलो की स्वतःला खूप भाग्यवान समजतो..आपण या सा-या मोठ्या कर्तृत्ववान माणसाशी संपर्क ठेवून होतो..परिचित होतो.. आणि हे एक भाग्यच नव्हे काय?
वाचकहो..!आज आपण सिंधुरत्न रमण माळवदे यांची ओळख करून घेऊ..पण त्यांना या जगातून जावून आता १४ वर्षे म्हणजे एक तप मागे सरले आहे..
++
रमण रामचंद्र माळवदे …!
मुंबई गोवा हमरस्त्यावर खारेपाटण हे प्राचीन ऐतिहासिक गाव सोडल्यावर तळेरे हे गाव लागते. या गावातून वैभववाडी मार्गाने कोल्हापूरकडे जाता येते नि जरा पुढे गेल्यावर एक रस्ता गिर्ये- विजयदुर्गकडे जातो.
या तळेरे गावी माळवदे यांच्या घराण्यात ४. फेब्रुवारी १९३९ रमण माळवदे याचा जन्म झाला.
माळवदे यांचे मूळ गाव साळशी, ता. देवगड हेआहे. त्यांचा बालपणीचा काही काळ साळशीत गेला. नंतर त्यांचं कुटुंब तळेरे येथे रोजी-रोटी साठी स्थलांतरित झाले. (माळवदे, कुबडे नावाच्या सर्व शिंपी समाज बांधवांचे मुळ गावं साळशीच आहे. वर्षातून एक दिवस ही सर्व मंडळी साळशीत येतात. )
त्यांनी नंतरच्या काळात लिहिलेली व गाजलेली ‘ वाघ इलो रे ‘एकांकिका साळशी गावातलीच आहे. म्हणजे त्यातील पात्र ही सर्व साळशीतील खरी पात्रं होती.
प्राथमिक शिक्षण गावी झाल्यावर ते इतरांप्रमाणेच चाकरमानी होण्यासाठी मुंबईत गेले पण तेथेही शिक्षण घेत राहिले. इंटर आर्टस पर्यत झाल्यावर ‘राष्ट्रभाषा पंडित’ ही परीक्षा दिली पुढे बी.पी. टी.मध्ये,नोकरी लागली ती त्यांनी २९ वर्षे केली. मात्र नोकरी करताना लेखणी हाती घेतली.स्वतंत्र व्यवसाय म्हणून पत्रकार क्षेत्रात आले आणि नाट्य, संगीत,साहित्य अशा विविध क्षेत्रातले रमले.
++


लेखन-
‘आपण सारे ”ही त्यांची एकांकिका त्रिदल प्रकाशन, मुंबई यांनी १९८५ प्रकाशित केली. पुढे
इंग्लिश मित्र. मित्र प्रका., मुंबई यांनी १९८८ प्रसिद्ध केले.
व्याकरण,कलंक,वाघ इलो रे. एकांकिका. लिहिल्या त्या त्रिदल प्रकाशनने १९८५ साली छापल्या.
त्यापूर्वी ते कथालेखन करत असत ‘दालन’हा त्यांचा लघुकथासंग्रह प्रिया प्रकाशन मुंबई यांनी १९८२ प्रकाशित केला होता. पुढे १९८८ साली
‘बनाटी ‘ हा लघुकथासंग्रह मनोरमा प्रकाशने प्रकाशित केला. पण सर्वात पहिला
‘ब्रह्माक्षर’ लघुकथासंग्रह के. भि. ढवळे प्रकाशने १९८० प्रकाशित केला होता. व त्याला
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. विद्यार्थी ,नोकरदार,नागरिक यांना उपयुक्त असे
‘संभाषण मित्र’हे मार्गदर्शनपर पुस्तक त्यांनी लिहिले. ते मुंबईच्या मित्र प्रकाशनने १९८९ प्रकाशित केले.
++
अशोक बेंडखेळे यांनी आपल्या ‘मनातली माणसं’या पुस्तकात रमण माळवदे यांच्याविषयी लिहिले आहे. ते लिहितात ‘नवोदित लेखकांशी देखील आपुलकीने वागणाऱ्या एक साहित्यिक मित्र रमण माळवदे हे लाघवी स्वभावाचे होते.अवघ्या सोळाव्या वर्षी बुज-या भित्र्या स्वभावाचे असलेले माळवदे हे नोकरीच्या शोधात मुंबईत येतात. आपल्या वाचनाच्या छंदापायी साहित्याच्या क्षेत्रात कसे प्रवेश करतात, हे विविध कर्तृत्वांसह तपशीलवार लिहिले आहे”
रमण माळवदे यांनी आतापर्यंत केलेल्या लिखाणातील निवडक लेख, कविता, बालसाहित्य या. भरीव आणि किरकोळ’ पुस्तकात संपादित केले आहे. १२ कथा, चार लेख, ६० कविता आणि एका एकांकिकेचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
या विषयी सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणतात,”माळवदे’ या पुस्तकातील लेख, कथांमधून त्यांची विद्वत्ता, मनाची उदारता दिसून येते.त्यांचं कल्पनाविश्व, अनुभव आणि माणूस या लेखनातून पुढे येत असते. माळवदे यांनी जीवनात खूप संघर्ष करुनही त्यांच्या लेखणीत एक प्रकारची प्रसन्नता आणि विनोद यांचा प्रत्यय येतो.” तर
सुभाष भेंडे यांनी म्हटले आहे की,”आयुष्यात आलेल्या अनुभवांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून विनोद करण्याची माळवदे यांची शैली आपल्याला आवडले. आयुष्यात भेटलेल्या लहान- हे मोठ्या व्यक्तींच्या अनुभवांतून हे पुस्तक साकारले आहे. सुखजीवन हेच पुस्तकाचं रहस्य आहे.” त्यांचे ‘शिवण्यापासून लिवण्यापर्यंन्त’आत्मकथनातून आपले सारे जीवन वाचकांसमोर ठेवतात.या आत्मकथनाच्या काही भागाचे अभिवाचन स्वाती गोखले यांनी केले आहे. समाजमाध्यमावर ते उपलब्ध आहे. तसेच संधिकाल प्रकाशन यांनी त्यांचे ‘निबंधमित्र’हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
तर असे हे तळेरे गावी वारंवार येणारे लालमातीवर,मालवणी मुलखावर ,बोलीवर प्रेम करणारे ‘बाळ्याचे वस्रहरण’ही मालवणी बोलीतून एकांकिका लिहिणा-या रमण माळवदे यांचे रोजी ठाणे येथे ८जुलै २००८ रोजी निधन झाले.
आपल्या मालवणी मुलखात किती मोठ्या मनाची-कर्तृत्त्वाची माणसं जन्मली.. घडली नाही?आपण त्यांना विसरता नये…!

————————————–
संदर्भ –
१)मराठी सारस्वत,अनमोल प्रकाशन,पुणे .
३)प्रसाद लाड,साळशी देवगड यांनी दिलेली माहिती ३)आवश्यक संदर्भ लेखात
नोंदवले आहेत .