सिंधुदुर्गचे माणिकमोती-(१४१ )
————————————
डाॕ.बाळकृष्ण लळीत.
(9665996260)
++
जयंत शिवराम साळगावकर.!
मालवण शहरावर अपंरपार प्रेम करणारे एक सिंधुरत्न..!
१ फेब्रुवारी १९१३ साली त्यांचा मालवण येथेच जन्म झाला. जुन्या काळातील मॕट्रिक पास झाल्यावर त्यांनी मुंबई गाठली. पण मालवणला शालेय शिक्षण घेतानाच पारंपरिक पद्धतीने संस्कृतचा अभ्यास केलाशिवाय ज्योतिषशास्राचा अभ्यास केला.
मुंबईत अनेक चाकरमान्यां प्रमाणेच त्यांनी अनुभव घेतले. अनेक ठिकाणी नोकरी केली, पण हाती लेखणी घेतली. पत्रकार झाले. पुढे व्यावसायिक झाले.
++
*लेखन प्रपंच-*
सुंदरमठ, देवा तुचि गणेशु या कादंबऱ्या लिहिल्या.धर्मशास्रीय जीवन हे पुस्तक लिहिले. वृत्तपत्रांतील शब्दकोडी लेखनामुळे त्यांना प्रसिध्दी मिळाली. १९७३ साली त्यांनी कालनिर्णय ही दिनदर्शिका प्रकाशित केली, आणि अल्पावधित तिला एवढी प्रसिद्धी व व्यावसायिक यश मिळाले की फक्त मराठी आवृत्तीचा खप ४८लाखांच्यावर पोचला. ती १४ वेगवेगळ्या भाषेतून प्रकाशित होऊ लागली, दूरदर्शनवर नोव्हेंबर महिन्यात ‘घरोघरी कालनिर्णय असावे!’या जाहिरातीने खरोखरच कालनिर्णय व जयंतराव महाराष्ट्रभर ओळखले जावू लागले.
हा व्याप सांभाळून ते सातत्याने लेख लिहित राहिले. देवाचिया द्वारि,सुंदरते ध्यान ,अमृताच्या खाणी,आनंदाचा कंद,ज्ञानाचा उद्-गार,दूर्वाक्षरांची जुडी,गणाधीश जो ईश ,रस्त्यावरचे दिवे,सगुण निर्गुण दोन्ही समान, भाव तोचि भगवंत. असे त्यांचे मराठी लेख संग्रह प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्र टाईम्स मध्ये ‘प्रातःस्मरण’हे सदर ते लिहित.
मालवण येथे त्यांनी ‘सुवर्ण गणेश मंदिर निर्माण केले. मी ते खास जावून पाहून आलो.अर्थात त्यांना या सर्व कार्यात त्यांच्या मुलांची साथ मिळाली. तसेच पत्नी जयश्रीताईची, त्या स्वतः लेखन करत. पाकशास्रावरील लोकसत्तातील त्यांचे ‘लाडूच लाडू’हे सदर खूप गाजले.
++
अध्यात्माचे गाढे व्यासंगी व
ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
मला आजही आठवतात.
“देव कसा आहे ?तो दिसतो कसा? भेटतो कुठे? हे जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा, उत्कट उत्कंठा अगदी लहानपणापासूनच त्यांना अस्वस्थ करीत असे. अशा वेळी त्यांनी आपल्या मालवणच्या घरातील उंबरठा ओलांडून पलिकडेच असलेल्या मारुती मंदिरात पाय ठेवताच त्यांना मारुतीचा मोठाच आधार वाटत असे. गणपतीबद्दल आकर्षण प्रेम आणि भक्ती उपजतच होती. ज्योतिषाचार्य वसंत लाडोबा म्हापणकरांच्या मालवणांत जयंत साळगावकराना ज्योतिषशास्त्राचे आकर्षण न होणे हे अशक्यच. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करुन संतवचनावर आधारित राशिभविष्य लिहून नाव लौकिक मिळविला. शब्दकोड्यांच्या व्यवसायात ते पडले पण तो व्यवसाय त्यांना एक ‘कोडेच’ ठरले. जबर आर्थिक हानी सोसावी लागली. त्याच स्थितीत परमेश्वराच्या देवाधिदेवाच्या कृपाछत्रास आपण पात्र असल्याचा साक्षात्कार ‘कालनिर्णय’ च्या जन्माने झाला. जगमान्यता प्राप्त झाली. लोकसत्तेत ‘देवाचियेद्वारी’ सदर सतत पाच वर्षे लिहून देवादिदेवाच्या सानिध्यात वावरण्याचा अनुभव घेतला.
आपले मनोगत व्यक्त करताना जयंत साळगावकर लिहितात बालपण प्रतिकुलतेत गेले. देवावर श्रध्दा बसण्यासाठी कुंतीप्रमाणे संकटे आणि प्रतिकुलता मागावी लागली नाही ती सोबतीलाच होती. “मी एकूलता एक, मित्रही फारसे नाहीत”. एकटेपणात देवच जवळच वाटे. उपासना मार्गाचा अवलंब आपोआप झाला आणि देवादिकांचे स्तोत्र, संतांच्या रचना वाचतच राहिलो. ज्योतिषाचा अभ्यास झाला. संतवचनावर आधारीत – राशीभविष्य उदंड लोकप्रिय झाले. ज्योतिषी म्हणून नाव झाले, ज्योतिषाचा व्यवसाय केला नाही. भविष्य सांगण्यासाठी एक रुपयाही कोणाकडून घेतला नाही. शब्दकोड्याच्या व्यवसायात जबरदस्त आर्थिक खोट आली. प्रचंड त्रास झाला. अगदी जवळची माणसेही उलटली. धंद्यात ठोकर खाल्यावर बघणाऱ्याची दृष्टीच बदलते. एक प्रकारे बहिषकृताचे जिणे वाट्याला आले. अडचणीत वेढलेला आणि संकटांनी ग्रासलेला लहानशा आधाराला किती आसुसलेला असतो ते अनुभवले. प्रतिकुलतेच्या खुंटीने मनाची तार ताणावी तसे झाले आणि त्या अवस्थेतसुद्धा एक यशोगीत आपोआप आकार घेऊ लागले. कालनिर्णयाचा जन्म झाला”. ईश्वराच्या सर्वव्यापी अस्तित्वाचा सुगंध आध्यात्मिक, प्रापंचिक, औद्योगिक वाटचालीत जाणवत राहिला.”
++
*-सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्र आणि इतर कामगिरी-*
मुंबई स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्र स्थापनेत महत्त्वाचे भूमिकाहोती. या शिवाय सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ह्या संस्थेचे विश्वस्त होते, तसेच ‘आयुर्विद्यावर्धिनी’ ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे काहीकाळ अध्यक्ष होते.
मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता, सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक होते, अध्यक्ष म्हणूनही कार्य केले.श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ,महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष तसेच इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष,दादर-माटुंगा कल्चरल सेंटरचे विश्वस्त,महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष.
१९८३ अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष स्थान भुषविले.मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड. सातारा जिह्यातील विटा येथे झालेल्य विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाली.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान,आळंदी यांनी बांधलेल्या श्रीज्ञानेश्वर मंदिराचे सन्माननीय उद्घाटन त्यांनी केले.
अशा प्रकारे मुंबई.कोकण बाहेरही त्यांनी कार्य केले. महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सातत्याने पुढाकार घेतला.
*पुरस्कार आणि सन्मान-*
२००४साली त्यांना अॕड. रमाकांत पालव यांच्या संस्थेतर्फे
‘सिंधुरत्न’या पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजेयाच कार्यक्रमात ‘मालवणी बोली साहित्य क्षेत्रात संशोधन केल्यामुळे याच पदवीने १८वर्षापूर्वी मलाही सन्मानित केले गेले, आपल्या घरच्यानी केलेला सन्मान हा सर्वश्रेष्ठ मानला जातो., तसे ते जयंतरावानाही वाटले.
त्यापूर्वी ‘ज्योतिर्भास्कर’ ही पदवी संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली होती.
तसेच ‘ज्योतिषालंकार’ ही पदवी मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे देण्यात आली,’ज्योतिर्मार्तंड’ ही पदवी तर चक्क पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिली गेली.
तसेच ‘महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठा’ने दिलेली डी. लिट. ही बहुमानाची पदवी दिली. त्यांना
नाशिकच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ‘वैदिक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. तसेच ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’तर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ‘भ्रमंती पुरस्कार’ मिळाला,
पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेल्या
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आहे.
तसेच ‘छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती, मुंबई तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’. दिला गेला तर महाराष्ट्र कला निकेतनतर्फे सांस्कृतिक कार्यासाठी ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्कार दिला गेला,
कृष्णमूर्ती ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे ज्योतिष शास्त्राच्या विशेष सेवेप्रीत्यर्थ ‘ज्योतिक कौस्तुभ’ पुरस्काराने गौरविले गेले. आणि श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, सातारा यांच्यातर्फे ‘समर्थ संत सेवा पुरस्कार’ दिला गेला.
अशा प्रकारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मात्र त्यांचे कार्य लक्षात घेता त्यांना ‘पद्मभुषण वा त्या तोडीच्या पुरस्काराने गौरव होणे आवश्यक होते.आजही त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अनेकांना केंद्र सरकार मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरव करते मग या सिंधुरत्नांना तो मिळायला नको का?
२० आॕगस्ट २०१३ रोजी कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे मुंबईत निधन झाले.
————————————
संदर्भ –
१) सिंधुरत्नभूषण स्मरणिका ,पृ.१४.२००४
२) माहितीचा महाजाल (इंटरनेट )वरील माहितीचा आधार.
३)१९८६साली दादर -नायगाव येथे कालनिर्णय कार्यालयात घेतलेली भेट.