पोंभुर्ले (देवगड)चे- शिक्षणमहर्षी एम.डी.जांभेकर यांचे निधन

Google search engine
Google search engine

मनोहर धोंड़देव जांभेकर ऊर्फ एम. डी. जांभेकर यांचे दि. २८जानेवारी २०२३ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ९२ वर्षी निगडी येथे वृद्धापकाने निधन झाले.
मनोहर धोंडदेव जांभेकर यांचा जन्म देवगड तालुक्यातील याच पोंभुले या गावी १३/११/१९३१ रोजी झाला. हे गाव व घराणे
प्रख्यात शिक्षणमहर्षी व मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे. हे सर्वज्ञात आहेच .
अतिशय गरीब परिस्थितीत प्राथमिक शिक्षण कोकणात पोंभुर्ले येथे झाल्यावर मनोहरपंतानी इतराप्रमाणे गाव सोडले व ते मुंबईत आले. खूप कष्ट घेऊन एकीकडे नोकरी करत ते
बी.एससी. (ऑनर्स) झाले, पण शिक्षणाची ओढ स्वस्त बसू देईना.
त्यांनी कायद्याची एल.एल. बी. ही पदवी प्राप्त केली..
तरूणपणी काही वर्षे पुण्यातील ‘मशिन टूल्स फॅक्टरी’ मध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून नोकरी करताना कायमच त्यांच्या मनात असे की, आपण एखादी ‘तंत्र शिक्षण संस्था’ स्थापन करावी व ती ही
कोकणातील आपल्या ‘कोकणी’ बांधवासाठी, कोकणातील मित्रांना घेऊन ! आपल्या कोकणातील मित्रांना
घेऊन १९६४ साली त्यांनी भाड्याच्या छोट्याश्या जागेत औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था ”
( ATSS)स्थापन
केली आणि या संस्थेत विविध प्रकारे तांत्रिक शिक्षण दिले जावू लागले. अशाप्रकारच्या शिक्षणांची पिंपरी चिंचवड
परिसरात त्याकाळी नव्याने स्थापन झालेल्या अनेक यांत्रिकी तसेच automobile उद्योगांना अतिशय गरज होती.
काळाची गरज ओळखून दिलेल्या या शिक्षणामुळे अनेक तरुणांना त्याकाळी ह्या उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी
मिळाली. चिंचवडच्या औद्योगिक नगरीत संस्थेसाठी एक जागा घेतली. कायम नव्याचा ध्यास, स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जिद्द आणि अपरिमित कष्ट करण्याची तयारी त्यांच्यामधे ठासून भरलेली होती. संस्थेत शिकणारी मुले गरीब घरांमधून येत त्यांच्यासाठी शिक्षणाबरोबरच त्यांनी जवळपासच्या उद्योगांशी बोलून अशा मुलांसाठी ‘जॉब वर्क’ घेऊन त्यांना काम देण्यास सुरवात केली. हे काम करताना त्यांनी काही कृषी अवजारे तयार केली ज्यासाठी त्यांना फोर्ड फाऊंडेशन रीसर्च स्कॉलरशिप मिळाली आणि कृषी अभियांत्रिकी मध्ये फिलिपिन्स मध्ये शिकण्याची संधी मिळाली.
आजूबाजूच्या बदलत्या गरजानुसार शिक्षण देणे ही औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेची ओळख बनली.
औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेने आधुनिक तंत्राज्ञान देणारे छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले. नियमित पदवीचे शिक्षण घेताना हे अभ्यासक्रम केल्यामुळे अनेक तरुण-तरुणींना नोकरी मिळवून स्वावलंबी होता आले. शिक्षणाची गुणवत्ता काय राखल्यामुळे ATSS संस्थेने सुरु केलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाना पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
२००० सालानंतर संगणक युग सुरु झाले आणि पिंपरी- चिंचवड हे संगणक उद्योगाचे केंद्र बनले. याही वेळी गरज ओळखून संस्थेने सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, डॉक्टर, शालेय विद्यार्थी, कामगार ..सगळ्यांसाठी संगणक अभ्यासक्रम राबवले. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये संगणक शिकवण्याची सुरुवात ATSS संस्थेने केली इथेच न थांबता लोकांच्या बदलत्या जीवन शैलीमुळे, बैठ्या कामामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींसाठी physiotherapy सारख्या उपायांची वाढती गरज ओळखून १९९२ साली जांभेकरांनी महाराष्ट्रातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त physiotherapy college सुरू केले.
पिंपरी चिंचवड मधील वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून २० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘सिटी प्राईड स्कूल’ही शाळा आज पुण्यातील अग्रगण्य शाळा मानली जाते,
गेल्या साठ वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन मार्गाला लावण्याचे मोठे काम मनोहर जांभेकर या आपल्या कोंकणी माणसाने पुण्यासारख्या शहरात येऊन केले आहे. ‘
मनोहर जांभेकर यांना ओळखून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही
शिक्षण गोरव पुरस्कार, रोटरी व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, लोकमत पीसीएमसी आयकॉन यानी जांभेकर सरांना गौरवलेले होते.
मनोहरपंतांचे कोंकण आणि कोंकणी माणसावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नव्हते .
‘ पुणे ही माझी कर्मभूमी असली तरी कोंकण ही माझी जन्मभूमी आहे, माझी ओळख आहे…..! असे ते मानतात त्यामुळेच पिंपरी चिंचवड मधील कोकणी समाज, संस्था ह्यांना औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था कायम मदत करते. पिंपरी चिंचवड, पुणे येथील अनेक कोंकणी विद्यार्थी इथे प्राधान्याने शिक्षण घेतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना संस्थेत शिष्यवृत्ती दिली जाते.
२००६ साली जांभेकर सर आणि त्यांच्या कोंकणी सहकाऱ्यांनी कोकण विकास मंच ” स्थापून कोकण विकासाचा योजनाबद्ध आराखडा केला होता.
केवळ पुण्यातच नाही तर कोंकणातील ” जिद्द” ह्या अपंग मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या संस्थेचे ते अध्यक्ष होते.
कै, मनोहरपंतांच्या मागे सुविद्य पत्नी नलिनी जांभेकर कन्या डाॕ अश्विनी कुलकर्णी आणि डाॕ
दीपाली सवाई त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत