वेंगुर्ले जन्मभूमी असलेले नाटककार-कॕ. मा.कृ.शिंदे

Vengurle native playwright-Kॕ. M.Kr.Shinde

 सिंधुदुर्गचे माणिकमोती-(१३९)
————————————-
डाॕ.बाळकृष्ण लळीत.
(9665996260)
—————————————-
नाटककार व विविध विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करणारे कॕ. मा.कृ.शिंदे हे नाव आता जवळजवळ विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे.असे असले तरी त्यांचे जीवन चरित्र गुं.फ. आजगावकर यांनी लिहून आपल्या सर्वांवर फार मोठे उपकार केलेले आहेत;अन्यथा एवढया महान ‘सिंधुरत्ना’विषयी एवढी सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकली नसती.
त्यांच्या घराण्याविषयी गुं.फ, आजगावकर यांनी माहिती दिली आहे ती अशी-
‘मूळपुरुष निमाजी शिंदे हे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात होते. इ. स.च्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात (इ. स. १६८३ साली) शिवाजी महाराजांचे सैन्य आचरे, कुडाळ, वेंगुर्ले वगैरे भागांत आले, त्याचवेळी शिंदे यांचे पूर्वज प्रथम वेंगुर्ले येथेआले आणि तेथेच स्थायिक झाले.दोडामार्ग-
भेडशी-मोर्ले येथून जवळ असणाऱ्या ‘किल्ले पारगड’वर रहाणारे हे घराणे पूर्वी ‘शिंदे गडकरी मोकाशी’ असे लांबलचक आडनाव लावत असे.(पारगडवर माझ्या ‘दुर्गमित्र’ संस्थेच्या वतीने २६ एप्रिल १९९० रोजी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली होती व ‘किल्ले पारगड -कथा व्यथा हा माझा लेख १ मे १९९० च्या दै. तारूणभारत बेळगाव(सिंधुदुर्ग) आवृत्तीत प्रसिद्ध झाला होता.या लेखात मी या शिंदे घराण्याचा उल्लेख केला होता तो असा –
गडाची एक छोटी चढण चढून पुढे निघावं…लागलीच छोटी छोटी दाटीवाटीने बांधलेली गडकरी मंडळीची घरं. आदर, स्वागत आणि वीरश्रीने बहरलेली असंख्य व्यक्तिमत्वे. चिरमुले, आढाव, मालुसरे, तांबे,नाईक, घुमघुमे, शेलार, नांगरे आणि शिंदे…..सारी माणसं शिवप्रभूंनी पूर्वी गोळा करून आणलेल्या शूरवीरांची वंशज.पारगडवर दुर्गप्रेमीने एकदातरी जावं. धन्य वाटतं.
यापैकी एक शिंदे घराणे वेंगुर्ले येथे स्थायिक झाले.त्या घराण्यातच मा. कृ. शिंदे जन्मले.
( लांब लचक आडनाव ते नंतर शिंदे’ एवढेच सुटसुटीत करण्यात आले ) मा. कृ. शिंदे यांचे पणजोबा व आजोबा हे देखील सैन्यात होते. आजोबा रामजी भिकाजी शिंदे यानी सैन्यातील नोकरी सोडल्यानंतर वेंगुर्ले येथील दिवाणी कोर्टात बेलीफ म्हणून नोकरी पत्करली आणि तोच वारसा शिंदे यांच्या वडिलांनी पुढे चालविला. वडील कृष्णराव रामजी शिंदे हे शिरिस्तेदारच्या हुद्यावर असताना सेवानिवृत्त झाले.
++
माधवराव कृष्णाजी शिंदे तथा कवि ‘मिलिंदमाधव’ यांचा जन्म जुन्या रत्नागिरी जिल्हयातील म्हणजेच सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या इतिहास प्रसिध्द शहरात ता. ३ सप्टेंबर १९०८ या दिवशी पहाटेस झाला. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षापासून शिंदे काव्यरचना करू लागले. त्यासाठी त्यानी’ मिलिंद माधव’ असे टोपण नाव धारण केले. त्यांच्या लेखनवाचन छंदाची स्फूर्ति त्यांच्या आद्य गुरु आत्याबाई श्रीमती उमाबाई नाईक या योगिनीतुल्य माऊलीकडून त्याना मिळाली, आणि त्या छंदाला प्रोत्साहन देणारे श्री.गोखले मास्तर म्हणजे च (प्रा. डॉ. वा दा. गोखले, एम, ए. पीएच.डी) नंतर देवासारखं त्यांना भेटले.तेच त्यांचे दोन गुरु होत. त्या दोन गुरूंचे शुभशीर्वाद हेच आपले सामर्थ्यं, असे ते कृतज्ञतेने मोठ्या अभिमानाने सांगत!असत. त्यानी नाटय साहित्य, युद्धकला,समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास केलेला असला आणि संस्कृत हो त्यांची आवडती भाषा असली, तरी त्यांच्या वाङ्मयीन पोषण संतवाङ्मयानेच झालेले आहे. असे गुं.फ, आजगावकर यांनी नमुद केले आहे.
++
मॅट्रिकपर्यंत शिक्षण वेंगुर्ले येथील त्यावेळच्या ‘जॉर्ज इंग्लिश स्कूल’मध्ये झाल्यावर ते मुंबईला आपल्या बहिण सुंदराबाई नाईक यांच्याकडे गेले. मुंबईत खोताच्या वाडीत १९२९ साली आले आणि काही काळ सरकारी नोकरी केली. १९३० साली लेखन व्यवसायाला सुरुवात केली. तो काळ स्वातंत्र्य चळवळचा होता.प्रथम त्यानी प्रभातफेरीची गाणी रचली आणि ती राष्ट्रीय पद्यावली’ या नावाने, त्यांचे मित्र श्री.भालचंद्र पांडुरंग सामंत यानी छापून प्रसिद्ध केली; परंतु यावेळच्या ९० व्या ऑर्डिनन्सने ती जप्त केला होता. ती गाणी म्हणत अनेक स्वातंत्र्यसैनिक तुरुंगात गेले आणि मिलिंदमाधव ‘गांधी माहात्म्य ‘ हे म.गांधीचे राजकीय(ओवीबद्ध ) चरित्र लिहिले श्री. सामंत यानीच ते ‘गांधी माहात्म्य प्रसिध्द केले. पुढे ते मौज, धनर्धारी अशा मासिकातून प्रकाशित झाले.
वरील ग्रंथाला जनरल वैद्य यांचा पुरस्कार लाभला होता.
++
कॅप्टन शिंदे, माधव कृष्णाजी ऊर्फ मिलिंद माधव हे
मुंबई मराठी साहित्य संघ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेपासून कार्यकार्ते. होते. मिनर्व्हाफिल्म कं., द्वारका पिक्चर्स इ. कंपन्यातून सह दिग्दर्शक, संवाद लेखक इ. कामे केली.त्यांच्या गीतांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या. दुसऱ्या महायुद्धात किंग्ज कमिशन मिळाले. पुढे कॅप्टन झाले. पुढे लष्करातील नोकरी सोडल्यावर भारत सरकारच्या चित्रपट विभागात अनेक प्रकारची कामे केली. काही काळ स्पेशल मॅजिस्ट्रेट होते. मराठी विश्वकोशासाठी लेखन केले. ‘ साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते अध्यक्ष होते. अशी नोंद मराठी सारस्वत या परिचय कोशात मिळते.
++
*नाटककार मा. कृ. शिंदे-*

‘ आज अनेकांना ज्या वैवाहिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.’ त्याप्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मा. कृ. शिंदे यांनी ९०वर्षांपूर्वी केलेला होता.
गृहलक्ष्मी हे त्यांचे नाटक विशेष महत्त्वाचे आहे.’परस्रीचे आकर्षक असणाऱ्या नव-याना पारंपरिक श्रद्धा व सोशिकता या बळावर आपल्या पतींना योग्य मार्गावर कसे. आणले या विषयावर मराठीत १९३२ते१९६३ दरम्यान सुमारे आठ नाटके रंगभूमीवर आली.’ या नाटककारात खंडेराव त्रिलोकेकर,प्र.के.अत्रे,सी.म. बापट,वनमाला भवाळकर मधुसुदन कालेलकर यांच्या प्रमाणेच आपले कोकणात जन्मलेल्या मा. कृ. शिंदे यांनी १९३२ साली या विषयावर पहिले नाटक लिहिले.
‘गृहलक्ष्मी मा. कृ.शिंदे यांची गृहलक्ष्मी’ही नाटिका प्रथम १९३२ साली प्रकाशित झाली. नंतर तिच्या स्वरूपात बदल होऊन १९४७ साली तीच नाटिका तीन तासांच्या नाटकाच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली.पती दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागल्यामुळे उत्पन्न झालेला वैवाहिक जीवनातील पेच कुमुदने कसा सोडविला हे या नाटकात दाखविले आहे.”( मराठी सामाजिक नाटक आणि स्त्री समस्या,पृ.१९०)
++
मुंबईत वर ते सैन्यदलात सामील झाले ४२ चे आंदोलन सुरु झाल्यावर व लष्करातून मुक्त झाल्यानंतर त्यानी ४२ चे आंदोलन हे राष्ट्रीय स्वरूपाचे नाटक लिहिले आणि ते फार गाजले. याच नाटकात जागतिक कीर्तीच्या सिनेमा अभिनेत्री श्रीमती दुर्गाबाई खोटे यानी एक महत्त्वाची भूमिका करून मराठी रंगभूमीवर प्रथम पदार्पण केले. त्या नाटकाचे मुंबई, पुणे, नाशिक येथेही प्रयोग झाले. त्या नंतर ते भारत सरकारच्या चित्रपट विभागात मराठी भाष्यलेखक व निवेदक म्हणून अनेक वर्षे नोकरीला होते. ते बरीच वर्षे जे. पी.आणि काही काळ स्पेशल एक्सक्यूटिव्ह होते.साहित्य निर्मिती लेखन हाच कॅप्टन शिंदे यांच्या जीवनाचा स्थायीभाव असून कवी, नाटककार, पत्रकार, लघुकथा लेखक, माहितीपट निर्माता,दिग्दर्शक, पटकथालेखक, भाष्यलेखक, निवेदक, लोकप्रिय वक्ते व समाजसेवक अशा विविध स्वरूपात त्यानी मराठी साहित्य समृध्द केलेले आहे. त्यांची सुमारे १११ लहानमोठी, गद्यपद्य पुस्तके प्रसिध्द झाली.
++
*कॅप्टन मा. कृ. शिंदे यांचे ग्रंथसंपदा-*
कॅप्टन शिंदे यांच्या दीर्घ व्यासंगाने आणि अभ्यासू वृत्तीने अनेक ग्रंथ लिहिले .
१) सिनेमा शास्त्र आणि तंत्र,
२) नाटक शास्त्र आणि तंत्र,
३) नाट्यसंहिता,
४) मराठी रंगभूमी- उगम आणि विकास,
५) मराठी वृत्तपत्र व्यवसाय आणि शास्त्र,
६) प्राचीन अर्वाचिन युध्द विज्ञान, ७) पत्रकार आणि पत्रकारिता,
८)आधुनिक शस्त्रास्त्रे- इतिहास आणि विकास,
९) संरक्षण शास्त्र आणि तंत्र,
१०) तमाशा (लावणी) नृत्य – महाराष्ट्राचे शास्त्रीय नृत्य
++
नाटयसंहिता. इंदिरा प्रका., मुंबई.
भगवान बुद्ध, शुभसंदेश
सुखाची जोड.विवाहितांसाठी.
नाटके, एकांकिका.
अमृत मंत्र.अर्थाचा अनर्थ. बचूबाई वागळे, मुंबई. १९४३.,अनुवाद. रामकृष्ण बुक डेपो,
गुंतागुंत अर्थात दोरीचा साप.मुंबई.१९४९.
गृहलक्ष्मी. रामकृष्ण बुक डेपो, मुंबई. १९४७.
चोरांचे संमेलन, धन्य आनंद दिन. नाजुक नवरा, बनावट बायको. नवमत प्रका. संस्था, मुंबई.१९४६.
४२ चे आंदोलन. रामकृष्ण बुक डेपो, मुंबई.१९४८.
बंडखोर कुमारी, निंबकर आणि मंडळी, मुंबई.१९४९.,मातृदेवो भव ! रामकृष्ण बुक डेपो, मुंबई. १९५०-
++
*धार्मिक ग्रंथ लेखन-*
कॕ.मा. कृ.शिंदे यांनी लिहिलेले पुढील ग्रंथ महाराष्ट्राभर वाचले गेले मात्र असे असुनही त्यांना या संदर्भात फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
उदाहरणार्थ –
अक्कलकोट स्वामी माहात्म्य,
अधिकमास माहात्म्य ,
अष्टविनायक स्तोत्र, माहात्म्य,
आधुनिक आरत्या,
एकादशी माहात्म्य, व्रतकथा’,
एकाध्यायी ओवी गीता,
एकवीरादेवी माहात्म्य,
अंगारकी चतुर्थी माहात्म्य,
ऋषीपंचमी व्रतकथा, पूजा, माहात्म्य.’काळभैरव वरद स्तोत्र – गणेशक्षेत्रे व गणेशतीर्थ.
गायत्री बोध (उपासना, गद्य), गायत्री स्तोत्र माहात्म्य गोंदवलेकर महाराज माहात्म्य,जयदेवी संतोषी,तुमचे लक्ष्मीपूजन तुम्हीच करा,दत्त आराधना,देवी आराधना, उपासना,देवी वरद स्तोत्र,नऊ ग्रहांची नऊ स्तोत्रे, नवदुर्गा कवच (सार्थ),नवनाथ लिलामृत.,नवरात्र माहात्म्य,
नरसिंह स्तोत्र, माहात्म्य व धावा,
पुळे गणपती स्तोत्र माहात्म्य. —- प्रदोष व्रत कथा,प्रभावी गणेशव्रते
भगवान बुद्ध माहात्म्य,मल्हारी माहात्म्य,महा मारुति स्तोत्र ,महा मृत्युंजय वरद स्तोत्र – महालक्ष्मी साधना व्रत,मिलिंद माधवी ओवी गीता,भक्तिमार्ग प्रदिप (योगमार्ग दर्शन ),मांगरीश – शांतादुर्गा स्तोत्र माहात्म्य.,राधाकृष्ण प्रेम माहात्म्य
++
गुं. फ आजगावकर म्हणतात- धार्मिक ग्रंथ नाटके सोडून जे संदर्भ म्हणून मराठीत लिहिलेले सर्व एका अर्थाने आद्य ग्रंथ आहेत. या लेखनामुळे त्या काळी अनेक तरुण अभ्यासकाना त्या विविध क्षेत्राची ओळख झाली.
वाङ्मयवीर कॅप्टन शिंदे हे सव्यसाची तपस्वी साहित्यिक होते आणि त्यानी अनेक नवोदितांना मार्गदर्शन करून प्रोत्साहनही दिलेले आहे. दृष्टीने ते नाट्य आणि साहित्यविद्येचे द्रोणाचार्यच आहेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.” मुंबईतील श्री.गजानन नारायण दाभोळकर, श्री. अच्युत बा. परमानंद यांचे मार्गदर्शन त्यांना मिळण असे. र. गो. सरदेसाई, अॕड.मधुकर व्ही.राव, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर,मनोहर सी. केळूसकर हे त्यांचे जवळचे सहकारी मित्र होते.मुंबईत ३१, खोताची वाडी येथे रहात. कॕ. मा. कृ.शिंदे यांनी ‘गृहलक्ष्मी’ या नाटकातून मालवणी बोली रंगभूमीवर आणली ही त्यांची कामगिरीही आपण विसरता नये. मी माझ्या मालवणी साहित्यावरील डाॕक्टरेटच्या प्रबंधात हा उल्लेख केलेला आहे.
वेंगुर्ले ही जन्मभूमी असलेल्या मा.कृ.शिंदे यांचे मुंबईत ४मार्च १९८७ रोजी निधन झाले.

———————————–
संदर्भ –
१) मराठी सारस्वत खंड२- अनमोल प्रका. पुणे.
२) आजगावकर गुं.फ.यांनी लिहिलेले कॕ. मा. कृ. शिंदे यांचे चरित्र.