दापोली शहरात विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात साजरी

दापोली l प्रतिनिधी: दापोली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, केळसकर नाका येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा व संबंधित योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली. सदर यात्रेच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची माहिती देणारी चित्रफित नागरीकांना दाखवण्यात आली, नगरपंचायतीच्या वतीने विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. उपस्थित मान्यवर व नागरीकांनी विकसित भारत संकल्पाची शपथ घेतली, तसेच ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ उपक्रमा अंतर्गत मेहेंदळे गॅस एजन्सीमार्फत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर यात्रेदरम्यान दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रिय नागरी उपजिविका अभियानाच्या दापोली शहराच्या समुदाय संघटक श्रीम. अनामिका सांबरे व शहरातील विविध बचतगट यांचे कडून स्टॉल उभारणात आले होते. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेची माहिती घेतली.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, नगरसेविका श्रीम. जया साळवी, श्रीम. कृपा घाग , श्रीम. प्रीती शिर्के, विकसित भारत संकल्पयात्रेचे नोडल अधिकारी श्री योगिराज बच्चे, दापोली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी प्रविण खरात, अभियंता सुनिल सावके, मेहेंदळे गॅस एजन्सीचे केदार परांजपे, महिला बचत गट, दापोली शहरातील नागरीक व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री मंगेश जाधव यांनी केले.