मंडणगड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात “वाचन संस्कृती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी वकील अनिल कुंभार, जिल्हा सत्र न्यायालय सांगली हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयात कार्यरत ग्रंथपाल श्री. दिगंबर हेमके यांनी आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना करत महाविद्यालयीन युवकांना वाचनाची आवड निर्माण करणे का गरजेचे आहे हे थोडक्यात सांगितले. त्यानंतर या व्याख्यानासाठी उपस्थित वकील अनिल कुंभार यांचे सहा. प्रा. अरुण ढंग यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
वकील अनिल कुंभार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, महाविद्यालयीन युवकांनी आपले कार्यक्षेत्र, वाचनाची आवड आणि ज्ञानाची निकड यांचा मेळ घालून वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. वाचनातूनच आपल्याला ज्ञान आणि प्रेरणा मिळते. वाचनातून मिळालेले ज्ञान आणि प्रेरणा युवकांना लेखक, उद्योजक आणि जबाबदार नागरिक बनवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असते त्यामुळे वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत मांडले. पुढे ते प्रसिद्ध लेखाकापासून उद्योजकांचे दाखले देत वाचनसंकृती जोपासण्याचे आवाहन केले. सहा. प्रा. अरुण ढंग यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी वाचन संस्कृती जोपासत आवांतर वाचन करतात याबाबत समाधान व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी खुशी खैरे, सानिका साळुंखे, निशा जगताप, साक्षी पांढरे, पूनम धोत्रे, वैभवी चोगले, अक्सा पेटकर, मानसी पंदिरकर, अक्षता पवार, शीतल पाटील, स्वप्नील कांबळे, गौरव सावंत, साहिल गौरत यांनी, त्यांनी वाचलेली विविध पुस्तके आणि त्यातून त्यांना मिळालेली प्रेरणा यावर त्यांचे अनुभव सांगितले. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्रही रंगले.
व्याख्यानाच्या शेवटी सहा. प्रा. मेटकरी यांनी नवीन पुस्तक वाचण्यास घेताना गीगल, कुकू एफएम, स्टोरीटेल यासारख्या अप्लिकेशनचा वापर प्रभावीपणे करण्यास सांगत व्याख्यानास उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या व्याख्यानास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.