सामाजिक बांधिलकीचा दीपस्तंभ म्हणजे अखिल कोकण युवा संघ – किसन भोसले

 

 

ज्ञान पंढरीच्या कुशीत रंगला कोकणवासियांचा मेळावा

कोकण युवा भूषण पुरस्काराचे झाले वितरण

संतोष कुळे l चिपळूण :

ज्ञान पंढरीच्या सानिध्यात अनेक कोकणवासीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करीत आहेत. याच ज्ञान पंढरीमध्ये सर्व कोकणवासीयांना एकाच छताखाली एकत्र आणून संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे शिवधनुष्य अखिल कोकण युवा संघ पुणे यांनी उचलेले आहे. या ज्ञान पंढरीत रंगलेला कोकणवासी यांचा मेळा आणि या मेळाव्यासाठी खास महिलांची अलोट गर्दी यातूनच कोकण युवा संघाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती येते, असे गौरव उद्गार पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष व उद्योजक किसन भोसले यांनी व्यक्त केले

पुणे येथील समृद्धी लॉन्स गार्डन मंगल कार्यालय धायरी येथे अखिल कोकण युवा संघाचा सातवा वर्धापनदिन सोहळा व कोकण भूषण पुरस्कार, स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्योजक किसन भोसले बोलत होते. यावेळी विचारमंचावर महाडचे आ.भरत गोगावले, महिला आयोगाच्या महाराष्ट्र अध्यक्षा रूपाली चाकणकर, संजय कदम, उद्योजक संतोष मेढेकर, सुनील मोरे, अरविंद चव्हाण, चंद्रकांत मोरे, कृष्णा कदम, पूजा पारगे, ममता दांगट, सचिन दांगट, सुभाष नाणेकर, अश्विनी पोकळे, स्वाती पोकळे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर गणेश वंदना व शिवकालीन मर्दानी खेळ करण्यात आले. यावेळी शर्वरी उतेकर हिने संभाजी महाराजांचा पोवाडा गात सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमात पुढे बोलताना किसन भोसले यांनी सांगितले की, पुणे सारख्या शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने येणारे कोकणातील सर्व बांधव अशा कार्यक्रमातून एकत्र येत असतात .त्यांना एका छाता खाली आणणे हे अग्निदिव्य आहे. मात्र, अशी किमया फक्त आखील कोकण युवा संघ पुणेच करू शकते असे त्यांनी गौरव उदगार काढले. यावेळी उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या ठिकाणी महिला विधवांचा केलेला सन्मान हीच खरी या कार्यक्रमाची पोच पावती आहे. आपण देखील दहा वर्षांपूर्वी विधवांचा सन्मान करत इतरांना सुद्धा असेच कार्यक्रम करून विधवा महिलांना सामील करण्याचे आवाहन केले होते. दुसऱ्या वर्षी माझ्या आवाहानाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. आज कोकण युवा संघाच्या माध्यमातून दहा विधवा महिलांना साडी व वान दिले. या विधवा महिलांना हळदीकुंकू सोहळ्यात समाविष्ट करून त्यांना मानसन्मान दिला. हीच खरी सामाजिक बांधिलकी असून तळागाळातील गरजूंना आणि अशा विधवा महिलांना आधार देण्याचे काम भविष्यात सुद्धा कोकण युवा संघाने करावे अशी प्रतिक्रिया रूपाली चाकणकर यांनी बोलताना दिली. त्यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्गाचे खास करून कौतुक केले. नंतर महाडचे आ.भरत गोगावले यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यानंतर येथील कोकणवासियांची गर्दी पाहून ते सुध्दा हर्षित झाले. एवढा जनसमुदाय आजपर्यंत आपण कुठल्याच कार्यक्रमाला पाहिला नव्हता अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या अखिल कोकण युवा संघाला लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी दिले. दरवर्षी अखिल कोकणी युवा संघाच्या वर्धापन दिनी समाजात काम करणाऱ्या अनेक उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव सुद्धा करण्यात येतो. यावेळी चंद्रकांत मोरे, संतोष गोपाळ, राजेश पवार, रूपाली निवदेकर यांना कोकण युवा भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल कोकण युवा संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनापासून प्रयत्न केले त्यामुळेच अलोट गर्दी या कार्यक्रमाला जमली होती. योग्य नियोजन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे दरवर्षीच अशा कार्यक्रमातून कोकणवासीयांना आनंद देण्याचे काम कोकण युवा संघाने केलेले आहे. सामाजिक उपक्रम राबवत वेळोवेळी गरजूना मदतीचा हात देण्याचे मोठे कार्य या युवा संघाच्या वतीने होत आहे. सातवा वर्धापन दिन सोहळा धायरी येथे रंगताना अध्यक्ष गणेश जाधव, सचिव सचिन उतेकर खजिनदार सुरेश शिगवण उपाध्यक्ष सुनील देशमुख सहसचिव प्रवीण मूकनाक ,महिला अध्यक्षा शोभा जाधव, उपाध्यक्ष संपदा शिगवण, प्रियंका उतेकर, कार्याध्यक्ष वैशाली देशमुख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.