भाजप नेते निलेश राणे यांनी आ. वैभव नाईक यांना सुनावले

 

 

मालवण | प्रतिनिधी : कामांवरील स्थगिती उठवून निधी आणला, आणला म्हणून मालवण कुडाळ मतदार संघात गाजावाजा करायचा, नारळ फोडायचे. प्रत्यक्षात निधीनाहीच, आणि असलाच तर तो किरकोळ स्वरूपात. आणि तो निधी कधी येणार तेही माहित नाही. अश्या स्वरूपात जनतेची फसवणूक करण्याचे व तोंडातून वाफा काढण्याचे काम आ. वैभव नाईक यांनी बंद करावे. असा जोरदार प्रहार करत भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गट आ. वैभव नाईक यांना सुनावले आहे.

 

राज्य सरकारने घातलेली स्थगिती उठवून निधी आणला म्हणून आपली पाठ थोपटून घेणाऱ्या आ. वैभव नाईक यांच्या कारभाराचा भाजप नेते निलेश राणे यांनी पर्दाफाश केला.

 

निलेश राणे म्हणाले, ठाकरे सरकार काळात चुकीच्या पद्धतीने जी कामे देण्यात आली होती त्यावरच या सरकार काळात स्थगिती देण्यात आली होती. त्या बाबत 84 आमदार एकत्रित न्यायालयात गेले त्यापैकी एक वैभव नाईक होते. त्यानी यात स्वतः काही केले असे काहीच नाही. काही कामांवरील स्थगिती उठली. मात्र हे मीच केले वकील खर्च मीच केला असे सांगत वैभव नाईक फसवणूक करण्याचे काम करत आहेत. प्रत्यक्षात मालवण कुडाळ मतदारसंघात विकास निधी आणण्यात नाईक अपयशी ठरले. असे असताना निधी आणला, आणला असे सांगून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरु आहेत. हे आता वैभव नाईक यांनी थांबवावेत.

 

मालवण कुडाळ मतदार संघात भाजप युती राज्य सरकार माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी येत आहे. जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे होते आहेत. यापुढेही अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी आम्ही शासनाच्या माध्यमातून प्रयत्नाशील असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.