कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर शासनाचे वतीने आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प रथ यात्रेच्या कुडाळ शहरी भागाचे उद्घाटन कार्यक्रमाचे वेळी मोदी सरकार या नावास आक्षेप घेवुन जमाव करुन घोषणाबाजी केली तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यास मला व शासकीय यंत्रणेस अटकाव केला अशी तक्रार नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातु यांनी दिल्यानंतर या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात कुडाळ नगरपंचायतीचे सत्ताधारी पक्षाचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट तसेच सचिन काळप व इतर 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातुन देण्यात आली.
या तक्रारीत अरविंद नातू यांनी नमुद केले की, विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम दि. 15 नोव्हेंबर रोजी पासून सुरु झालेली असून 26 जानेवारी 12024 रोजी पर्यंत ही यात्रा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयांना भेटी देणार आहे. शासन निर्णयानुसार या मोहीमे अंतर्गत प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची असून जिल्हाधिकारी हे सदर अनुषंगाने गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयात दि. 28 डिसेंबर रोजी पासून सदर यात्रेचे शासनाचे वतीने नियोजीत होती. व शासन निर्णयानुसार शहरी भागाची जबाबदारी शासनाच्या वतीने नगरविकास विभागाची असल्याने कुडाळ शहरात सदर विकसित भारत संकल्प यात्रेची पूर्व तयारीच्या जबाबदारी ही कुडाळ नगरपंचायतीवर असल्याने दि. 27 डिसेंबर रोजी 11.00 वा. नगरपंचायत कार्यालयात सदर यात्रेच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीसाठी नगरपंचायतचे नगरसेवक हजर होते. सदर कार्यक्रमाचे नियोजनाकरीता समिती गठीत करण्यात आलेली होती त्यामध्ये नगरसेविका संध्या तेरसे, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, सौ. प्राजक्ता बांदेकर,नगरसेवक राजीव कुडाळकर, अभिषेक गावडे, गणेश भोगटे, विलास कुडाळकर,रामचंद्र परब, समितीचे सदस्य म्हणून घेण्यात आलेले होते. सदर बैठकी दरम्याने नगरपंचायत कुडाळचे विद्यमान सत्ताधिकारी पक्ष राष्ट्रीय काँग्रेस तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे
नगरसेवक यांनी सदरच्या कार्यक्रमास भारत सरकार असे नाव असेल तर त्या कार्यक्रमास आपला सहभाग असेल मोदी सरकार असे नाव असल्यास आम्ही कार्यक्रम उधळून लावू, असे मत व्यक्त केलेले होते. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून आम्ही पोलीस विभागाला कळविलेले होते.
दि. 28 डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प रथ यात्रा सिंधुदुर्ग जिल्हयात दाखल झालेली होती. दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 3वा. सदर यात्रारथ कुडाळ नगरपंचायतचे समोरील पटांगणात येणार असल्याने शासनाचे वतीने नगरपंचायत मार्फत योग्य ती तयारी करण्यात आलेली होती. तसेच शासनाचे विविध योजनांचे लाभार्थी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करणे, तसेच शासनाचे विविध योजनांबाबत लाभार्थी यांना माहीती देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले होते.
दुपारी 3.30 वा. चे सुमारास विकसित भारत संकल्प रथ यात्रा कुडाळ नगरपंचायतीचे समोरील पटांगणावर आल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायतीचे वतीने मी स्वतः, तसेच गठीत केलेल्या समिती मधील नगरसेवक सदस्य संध्या तेरसे व इतर सदस्य असे मिळून पुढील कार्यक्रम करीत असताना त्या ठिकाणी नगरपंचायत कुडाळचे सत्ताधारी पक्षाचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक, मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, व सचिन काळप तसेच इतर 10 ते 12 लोक मिळून कार्यक्रमाचे ठिकाणी आले व त्यांनी विकसित भारत संकल्प रथ हा भारत सरकारचा असून त्या व्हॅनवर भारत सरकार लिहीलेले नसून मोदी सरकार असे लिहीले असल्याबाबत आक्षेप घेऊन भारत सरकार लिहीले नसल्यास सदर कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, असे सांगू लागले त्यावेळी आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता ते सर्व जण घोषणाबाजी करु लागले व कार्यक्रमाचे उदघाटन करण्यास अटकाव करु लागले. त्यावेळी त्याठिकाणी बंदोबस्ताकरीता उपस्थीत असलेल्या पोलीसांनी त्यांना बाजूला केलेले होते. त्यानंतर कार्यक्रमाचे ठिकाणी इतरही काही लोकप्रतिनिधी येऊन घोषणाबाजी करीत होते अशी तक्रार दिली असुन या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट तसेच सचिन काळप व इतर 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.