मालवण | प्रतिनिधी : मालवण शहारात शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रा रथ दाखल झाला. यात्रेचे मालवण नगरपालिकेतर्फे तसेच भाजप पदाधिकारी व नागरिकांनी उत्सपूर्त स्वागत केले. नागरिकांना शासकीय योजनाची माहिती तसेच लाभ देण्यात आला.
भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहिम दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत विहीत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मालवण शहरात “विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन झाले. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, रविकिरण तोरसकर, आपा लुडबे व ललित चव्हाण, दीपा शिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्तमात केंद्र शासनाच्या पी.एम. स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, आयुष्यमान कार्ड शिबिर, मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे यासारख्या विविध योजनांबद्दल जनजागृती करून संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तसेच सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी नागरिकांना योजना नोंदणी व लाभ दिल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच उपस्थिताना विकसित भारताची शपथ देण्यात आली.