सासूच्या घराचे नुकसान केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल

कणकवली : फोंडा-हवेलीनगर येथील रेश्मा रमेश खाडये (५०) यांच्या घराचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जावई मायकल मनवेल फर्नाडिस (३३, रा. कळसुली हायस्कूलजवळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रेश्मा खाडये यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १२.४५ वा. च्या सुमारास घडली.

रेश्मा खाडये यांची मुलगी रुचिका हिचे २०१७ मध्ये मायकल फर्नांडिस याच्याशी लग्न झाले. दरम्यान १४ डिसेंबर रोजी मायकल यांने रुचिकाला मारहाण केल्यामुळे रेश्मा खाडये यांनी मुलीला माहेरी आणले होते. या रागातून मायकल फोनद्वारे रेश्मा यांच्या कुटुंबीयांना मारून टाकीन, घर जाळीन अशी धमकी देत होता.

याबाबतची खबर १९ डिसेंबर रोजी कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा समज दिला होता. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचा राग मनात ठेवून मायकल याने २९ डिसेंबरच्या रात्री घरावर दगड मारला. त्यामुळे घराच्या पत्र्याचे नुकसान झाले. त्यावेळी सर्व कुटुंबीय घराबाहेर आले असता मायकलने रेश्मा यांच्या सासू सत्यवती खाडये यांच्या उजव्या पायावर दगड मारून दुखापत केली. त्यादरम्यान आरडाओरडा केला असता शेजारी राहणारे अशोक मेजारी येताच मायकल फर्नाडिस तेथून फरार झाला. असे रेश्मा खाडये यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत