हायटेक आगार होता होता हात टेकण्याची आली वेळ
चिपळूण ( वार्ताहर) :प्रवासी सेवेचे केंद्रबिंदू असलेल्या कोकणातील चिपळूण हायटेक बस स्थानकाचे बांधकाम पूर्णत्वास जाण्याची काही नावच घेत नाही. सन 2018 पासून रडत रखडत आणि मंद गतीने काम सुरू असलेल्या या कामामुळे प्रवाशी मात्र पुरते त्रस्त झाले आहेत. मोठ्या थाटामाटात भूमिपूजन झालेल्या या बस स्थानकाचा गेल्या पाच वर्षात साधा पाया सुद्धा मार्गी लागलेला नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे हायटेक स्थानक बांधकामाचा हाय व्होल्टेज ड्रामा दिसून येत आहे. या कामाला ब्रेक लागलेला असून पुन्हा काम संथ गतीने सुरू आहे.
हायटेक बस स्थानकाची आधुनिक इमारत पहण्यासाठी अजून काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असे बोलले जात आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाचे चिपळूण आगराची जुनी इमारत पाडून हायटेक बस स्थानक उभारण्याचे काम सुरू केले . तात्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी 23 फेब्रुवारी 2018 मध्ये या प्रकल्पाची भूमिपूजन केले . वर्क ऑर्डर मिळूनही सुमारे दीड ते दोन वर्षे काम सुरू झाले नाही. त्यानंतर संबंधित ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली .मात्र त्या कामाला काही महिन्यातच ब्रेक लागला. त्यानंतर कोरोनाचे कारण पुढे केले गेले. पुन्हा काम सुरू झाले आणि कामाचे बिल मिळत नसल्याची ओरड सुरू होऊन ते काम पुन्हा थांबले. कामात प्रगती न झाल्याने कामाचा ठेका घेतलेल्या पहिला ठेकेदार बदलण्यात आला. आता सातारा येथील श्री कदम यांना या कामाचा ठेका मिळाला. स्टील डिझाईन न मिळाल्यामुळे नवीन ठेकेदाराकडून दोन ते तीन महिने काम रखडले. मात्र त्यानंतर कामात पाहिजे तशी प्रगती दिसून आली नाही. कामाचे बिल मिळत नसल्याने तांत्रिक अडचणीमुळे अधून मधून काम ठप्प होत आहे. एक एक, दोन दोन महिने काम थांबले .
दीड ते दोन महिन्यापूर्वी सुरु केलेले काम नवीन ठेकेदाराने थांबवले होते. आता पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. सध्या नवीन इमारतीच्या फ्लोरोवर पीसीसी चे काम सुरू आहे . तर दुसरीकडे कॉलम उभे केले जात आहेत. पिसीसीच्या कामासाठी २२ तर सेंट्रीगच्या कामासाठी ५ असे एकूण २८ कामगार काम करीत आहेत. तरी या कामाला हरीश फडतरे हे नाईट इंजिनियर म्हणून काम पाहता आहेत. या कामासाठी सप्टेंबर 2024 ची मुदत आहे. या मुदतीत ठेकेदार ला प्लॅटफॉर्म, आरक्षण,हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही, वाय-फाय व्यवस्था, स्वतंत्र पार्किंग, अद्यावत विद्युत व्यवस्था, यांच्या सह चालक वाहकासाठी स्वतंत्र विश्रांती गृह यांच्या सह सुसज्ज इमारत उभारावी लागणार आहे. आतापर्यंत कामाचा अनुभव पाहता शासनाकडून मिळालेल्या मुदतीत काम पूर्णत्वास जाईल की नाही याबाबत खुद्द ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांनाही शाश्वती नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हायटेक आगार होताना अक्षरशः हात टिकण्याची वेळ आली आहे.