अनुलोम मार्फत पांगरे बुद्रुक येथील पांडवकालीन लेणी स्वच्छता

राजापूर: राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथे पांडवकालीन लेणी स्वच्छता अभियान सेवा उपक्रम अनुलोम संस्थे मार्फत राबविण्यात आला.

 

ऐतिहासिक वारसा लाभलेले असे हे ठिकाण असून पांडवांनी एका रात्रीत बांधलेली पांडवकालीन लेणी अशी या क्षेत्राची आख्यायिका आहे. संपूर्ण जांभ्या दगडामध्ये कोरलेली अशी ही लेणी असून यामध्ये एक मुख्य लेणी व बाजूला काहीशा अंतरावर जांभ्या दगडात कोरलेल्या तीन लेण्या तसेच मुख्य लेणीमधील भुयारामध्ये एक लेणी आहे असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

 

ग्रामपंचायत पांगरे बुद्रुक च्या माध्यमातून या लेणींना क-वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असल्याचे समजते.

कोकणात या प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली अनेक ठिकाणे असून नेहमीच दुर्लक्षित राहिलेली आहेत. पांडवकालीन लेणी बाबत समाजात जागृती व्हावी व पर्यायाने स्वच्छतेच्या माध्यमातून हे ठिकाण पुन्हा चर्चेत यावे जेणेकरून पर्यटन स्थळ विकसित होऊन अधिक संशोधन व्हावे या उद्देशाने अनुलोम मार्फत सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 

या सेवा उपक्रमासाठी अनुलोम हातीवले वस्तीमित्र राजू कार्शिंकर, चिखलगाव स्थानमित्र राजेश कुडकर, पांगरे बुद्रुक मधील जेष्ठ ग्रामस्थ सिताराम तोरस्कर, संतोष शिंदे, ग्रा.पं. सदस्य विश्वराज सावंत व अनिशा झिमण, वृषाली सावंत, ग्रा. पं. कोतवाल संदीप पिलके, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश मयेकर, राजापूर वस्तीचे पालक मोहन घुमे, भाग जनसेवक मंगेश मोभारकर, ओणी वस्तीमित्र दिपक बावकर, गोठणे दोनीवडे वस्तीमित्र स्वप्नील चौगुले इत्यादी उपस्थित होते.