‘प्लास्टिक कचरामुक्त रत्नागिरी’ साठी अनोखा संकल्प
प्लास्टिकचा कचरा दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. या प्लास्टिक कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन आणि पुनर्चक्रीकरण यासाठी सुयोग्य व्यवस्था सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. ही समस्या ओळखून रत्नागिरी शहरात ‘अनबॉक्स: युवर डिझायर’ या ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप द्वारे दारोदारी प्लास्टिक संकलन करण्याची अनोखी यंत्रणा नव्या वर्षांपासून सुरु होत आहे.
‘अनबॉक्स’ हे रत्नागिरीतील युवक गौरांग आगाशे यांनी निर्माण केलेले, गेली तीन वर्षे रत्नागिरी शहरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा देणारे ऍप आहे. रत्नागिरी शहरात सुमारे —— हजार वापरकर्ते आहेत. ‘स्वीगी’, ‘झोमॅटो’ या जागतिक कंपन्यांना टक्कर देत ‘अनबॉक्स’ संपूर्ण रत्नागिरी शहरात चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाले आहे. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येचा विचार करता जी यंत्रणा फूड डिलिव्हरीसाठी निर्माण केली गेली आहे तीच यंत्रणा प्लास्टिक कचरा संकलनासाठी वापरता येईल का हा विचार झाला आणि दि. १ जानेवारी २०२४ या नववर्षाच्या प्रारंभदिनी याची घोषणा करण्यात आली. दार महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘अनबॉक्स’ तर्फे दारोदारी प्लास्टिक कचरा संकलन आता केले जाईल.
रत्नागिरी शहरवासीयांना असे आवाहन करण्यात आले आहे की आपापल्या घरचा प्लास्टिक कचरा कोरडा करून एका पिशवीत साठवून ठेवावा. यामध्ये पिशव्या आणि बाटल्या व इतर कडक प्लास्टिक हे वेगळे साठवावे. ‘अनबॉक्स: युअर डिझायर’ या ऍप वर एक लिंक तयार केली आहे. या लिंकवर क्लिक करून आपल्या घरी साठवलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या पिशवीचा फोटो अपलोड करावा. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘अनबॉक्स’ तर्फे ही प्लास्टिक कचऱ्याची पिशवी घरी येऊन नेली जाईल.
संकलित झालेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्चक्रीकरणाची जबाबदारी रत्नागिरीतील उद्योजक मल्हार मलुष्टे यांनी उचलली आहे. प्लास्टिक कचरा संकलनासाठी शहरात भंगार गोळा करणाऱ्या काही व्यक्तींना या यंत्रणेशी जोडून घेण्यात आले आहे. यामाध्यमातून अशा व्यक्तींबद्दल समाजात आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे. कचरा संकलन ही गोष्ट आत्तापर्यंत कुठेच अर्थव्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात नव्हती. ती असंघटित क्षेत्राचाच भाग होती. ‘अनबॉक्स’ च्या या उपक्रमातून प्लास्टिक कचरा संकलन ही गोष्ट संघटित क्षेत्रात आणण्याचा एक प्रयत्न होत आहे. ही गोष्ट अन्य शहरांमध्येही अनुकरणीय आहे. ‘प्लास्टिक कचरामुक्त रत्नागिरी’ च्या या मोहिमेत जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन ‘अनबॉक्स’ तर्फे करण्यात आले आहे.