राजापूरातील रेल्वे समस्यांबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना निवेदन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील राजापूर रोड स्थानकावर जनशताब्दी, नेत्रावती एकस्प्रेससह अन्य गाड्यांना थांबा मिळावा, या ठिकाणी रेल्वे तिकीट आरक्षणाचा कोटा वाढवून द्यावा यांसह अन्य विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा मागण्या कोकण रेल्वे प्रशासनाकडे पंचक्रोशी ग्रामविकास समितीतर्फे सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, त्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, या सर्व मागण्यांना मंजूरी मिळून त्याची पूर्तता व्हावी अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूरने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. या मागण्याची पूर्तता न झाल्यास भविष्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे यांना पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आदीनाथ कपाळे, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबईचे सचिव यशवंत जड्यार यांनी नुकतेच दिले.

कोकणातून धावणार्या कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकण परिसर देशभरातील विविध ठिकाणांना जोडला गेला आहे. कोकण रेल्वेला येथील प्रवाशांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेला त्याचा चांगलाच आर्थिक फायदा होताना दिसत आहे. मात्र, कोकण रेल्वेच्या थांब्यावर विविध एक्स्प्रेस गाड्यांना नसलेले थांबे, कमी असलेला आरक्षण कोटा आणि प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या अन्य सोयीसुविधांचा अभाव यांमुळे कोकणवासियांना कोकण रेल्वेचा काहीशी फायदेशीर ठरताना दिसत नाही. तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोडस्थानकावर मर्यादीत आरक्षण कोटा आहे. जनशताब्दी, नेत्रावती एकस्प्रेससह अन्य गाड्यांना अद्यापही थांबा नाही. याचा फटका तालुकावासियांना बसत आहे. त्यामुळे मिळावा जनशताब्दी, नेत्रावती एकस्प्रेससह अन्य गाड्यांना अद्यापही थांबा मिळावा, या स्थानकावरील आरक्षण कोटा वाढवावा आणि प्रवाशांना आवश्यक असलेल्या अन्य सोयीसुविधांची उभारणी व्हावी यांसारख्या अन्य विविध मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याबाबतची निवेदनेही कोकण रेल्वे प्रशासनाला दिली आहेत. मात्र, त्यांची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. याकडे पंचक्रोशी ग्रामविकास समितीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.