राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओणी येथील ओणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आठव्या वर्षी आयोजित केलेल्या कै. जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत कुडाळ येथील ‘ढ मंडळी संस्थेच्या ‘ढिम टँग ढि टँग’ या एकांकिकेने विजेतेपदाचा बहुमान पटकावला. वैयक्तिक बक्षिसांमध्ये याच एकांकिकेने बाजी मारताना तब्बल पाच बक्षिसांची कमाई केली.
संस्थाध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षिस वितरण समारंभामध्ये विजेत्या एकांकिकेला प्रसिद्ध नाट्यकर्मी वामन पंडीत, परिक्षक महेंद्र तेरेदेसाई आदी मान्यवरांच्या हस्ते रोख ३० हजार रूपयांच्या बक्षिसासह शिल्ड आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये लांजा येथील अमोल रंगयात्री संस्थेच्या ‘लोकडावून’ आणि मुंबई येथील नाट्यकिर्ती संस्थेची ‘इरिका यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटाकाविला. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे रोख २५ हजार आणि २० हजार रूपये बक्षिस, शिल्ड आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ओणी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कै. जयवंत दळवी राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडला. यावेळी श्री. पंडीत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, संस्था संचालक गणपत भारती, अरविंद गोसावी, नामदेव तुळसणकर, प्रमोद लिमये, अॅड. गुरूदत्त खानविलकर, अॅड. एकनाथ मोंडे, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, नारायण आंग्रे, श्रीराम तुळसणकर, सुर्यकांत तुळसणकर, विजयकुमार वागळे, संतोष वडवलकर, प्रथमेश वडवलकर, नाथ गांधी, अनंत नागम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पंडीत यांनी ओणीसारख्या ग्रामीण भागामध्ये राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेचे आयोजन करणे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. तर, परिक्षक श्री. तेरेदेसाई यांनी बोलताना स्पर्धा ही केवळ निमित्त असून नाटक वा एकांकिकेकडे व्यक्तीमत्व विकास म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे मत मांडले. यावेळी श्री. तुळसणकर यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे स्पर्धा यशस्वी पार पडल्याचे सांगताना त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद मिरगुले यांनी केले. या स्पर्धेतील प्रकाशयोजना: दयानंद चव्हाण (लोकडावून), संगीत: भावेश व इतर (ढिम ढँग ढि टँग) , नेपथ्य : कॅलिडोस्कोप, अभिनय :प्रथम- आरव आईर (ढिम ढँग ढि टँग), द्वितीय-अक्षता पांचाळ (लोकडावून), तृतीय-ईशा जोशी (इरिका), चौथा : साक्षी कोळी (कॅलिडोस्कोप), पाचवा : तेजस मस्के (ढिम ढँग ढि टँग), लेखन : प्रथम : विठ्ठल तळवळकर (ढिम ढँग ढि टँगृ), द्वितीय: साबा राऊळ (इरिका), दिग्दर्शन : प्रथम : महेश बामणे (लोकडावून), द्वितीय : विठ्ठल तळवळकर (ढिम ढँग ढि टँग) यांनी स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे पटकाविली.