शिळ लघु पाटबंधारे धरण प्रकल्पामुळे बारमाही शेती, फळबागायतीला मिळणार चालना

प्रकल्पाचे ७० टक्के काम पुर्णत्वाकडे

शेतीतृन समृध्दीचे स्व्प्न होणार साकार

संतोष मोंडे | राजापूर: शहरानजीकच्या शिळ येथे शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत सुमारे ९५ कोटी ३७ लाख रूपये खर्चुन ५४६६ सहस्त्र घन मीटर जलसाठा क्षमतेच्या लघु पाटबंधारे धरण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे शिळ आणि हातणकरवाडी येथील ३७५ हेक्टर जमिन ओलिताखाली येणार आहे. आगामी वर्षात या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास जाण्याची शक्यता असून या प्रकल्पामुळे भविष्यात बारामाही शेती आणि फळबागायतीला चालना मिळणार असून शेतीतून समृध्दी साकारण्याचे स्वप्न साकार होण्यास हा प्रकल्प महत्वपुर्ण ठरणार आहे.
दिवसागणिक खोल जाणारी पाण्याची पातळी, बदलेले ऋतुचक्र यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने लघु पाटबंधारे धरण प्रकल्पांच्या माध्यमातून अशा योजना हाती घेतल्या आहेत. त्या अनुषंगाने लघु पाटबंधारे धरण प्रकल्पांसाठी जागा निश्चित करून शासन अशा प्रकल्पाना प्राधान्य देत आहे. शिळ येथे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पानंतर लाभ क्षेत्रातील गावांना जलसिंचनासाठी मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पडीक जमिन सिंचनाखाली येणार असून पारंपारिक शेती, बागायतीबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

पाण्याअभावी मागे पडलेल्या बारमाही शेतीला यातून संजिवनी मिळण्यास मदत होणार असून पशुपालन, दुग्धोत्पादन यासारख्या रोजगारामुख व्यवसायाच्या संधी निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्वपुर्ण ठरणार आहे.मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ५६.०५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. शिळ येथील उंबळी सखल भागात देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीमार्फत काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत या प्रकल्याचे प्रत्यक्ष उभारणीचे ७० टक्के काम मार्गी लागले आहे. यामध्ये उजव्या बाजुचे मातीकाम पुर्ण करण्यात आले असून मुख्य विमोचक उभारणीचे काम हाती घेणेत आले आहे.

या प्रकल्पाचे धरण स्थळापर्यंतचे पाणलोट क्षेत्र २.४० चौ. कि.मी असून त्यातून ५४६६ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा धरणेत आला आहे. या प्रकल्पाची माथा उंची ६.५० मीटर असून लांबी ४१० मीटर असणार आहे. सांडव्याची लांबी २७.०० मीटर आहे. धरणाची जास्तीत जास्त उंची ४५.४३ मीटर राहणार आहे. धरणाच्या माथ्याची पातळी १४३.५० मीटर राहणार आहे. तर मुक्त पध्दतीचा सांडवा धरणाच्या उजव्या बाजुस ४२५ मीटर ते ४५२ मीटर अंतरावर प्रस्तावीत आहे. तर तर सलोह संधानकामध्ये एम. एस. पाईप कंडयुट विहिर व उर्ध्व व अधो बाजुस प्रणाल प्रकारचा सिंचन विमोचक प्रस्तावित करण्यात आला आहे. सिंचन विमोचकाची लांबी ३२३ मीटर प्रस्तावित आहे. या योजनेसाठी दोन्ही बाजुनी दोन कालवे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये डावा तीर कालवा ४ किमी तर उजवा तीर कालवा ३ किमी चा राहणार आहे. हे कालवे पारंपारिक पध्दतीचे न करता बंदिस्त पाईप लाईन पध्दतीद्वारे पाण्याचे वितरण केले जाणार आहे. या धरणाकडे जाण्यासाठी धरण पोच रस्ता करणेत येणार असून त्यासाठी भूसंपादन करून रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती प्रकल्प जलसंधारण अधिकारी एस. पी. लाड यांनी दिली आहे.

हे धरण माती प्रकारचे असल्याने धरणाच्या पायाच्या मजबुतीच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. धरणाच्या खालील बाजुस पायाजवळ अश्मपदाग्र (Rock Toe) ची साखळी ० ते ४१० मीटर पर्यंत करण्यात आली आहे. त्याच्या बाहेरील बाजुचा उतार संबंधीत कवच गाभ्याच्या भरावास अनुसरून ठेवण्यात आला आहे. तर धरणाच्या उर्ध्व बाजूस व मागील बाजूस दगडी पिचिंग करण्यात आले आहे. तर जलरोधक खंदक कठीण खडकापर्यंत घेण्यात आला असून जलरोधक खंदकाची नाल्यामधील रूंदी ५ मीटर ठेवण्यात आली आहे. भूस्तर वर्गीकरणानुसार खंडकास ०.६० मी. खोलीने कठीण खडकात खोदून त्यावर धरणाचे बांधकाम करण्यात आल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी ४ (१) ची अधिसूचना दि. ३ जून २०२२ रोजी प्रसिध्द करणेत आली आहे. तर सामाजिक परिणाम निर्धारण अहवाल भाकर सेवा संस्थेतर्फे पुर्ण करण्यात आला आहे. तर योजनेच्या भू संपादन प्रकरणी रू. २५०.०० लक्ष रक्कम उपविभागीय कार्यालय राजापूर यांच्याकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती श्री. लाड यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीचा मोबदला व झाडांची नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही उपविभागीय कार्यालयाकडून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी वर्षभरात या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असून पुढील वर्षीपासून धरणात पाणीसाठा करणे शक्य होणार आहे.

बळीराजाला अधिक सक्षम करताना व शेतीतुन समृध्दीचा मार्ग निर्माण करताना केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यामुळे आज शेतीला चांगले दिवस येत आहेत. या शेतीसाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे पाणी होय. या पाण्याचा शोध घेत त्याचे स्त्रोत वाढवून भविष्यात बारमाहि शेतीलाही प्रोत्साहन दिले आहे. राजापुर तालुक्यात गेल्या काही वर्षात झालेल्या अर्जुना मध्यम प्रकल्पासह अनेक प्रकल्पांच्या माध्यमातुन पाणीसाठी दिसून येत असून त्याचा लाभ आज ग्रामीण भागातील अनेक शेतकरी घेत आहेत. आता राजापूर तालुक्यात आणखी एका नवीन धरण प्रकल्पाची भर पडत आहे. त्यातून गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने हा प्रकल्प त्याची नांदी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना अद्याप मोबदला नाही
हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देताना आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे. मात्र प्रकल्पाचे काम पुर्णत्वास जात असताना प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला व झाडांची नुकसान भरपाई वेळीच देण्याबाबत शासन प्रशासन स्तरावर अनास्था असल्याचे प्रकल्प बाधीत शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासनाने प्रकल्पाना होणारा विरोध लक्षात घेता त्यांना त्यांच्या मागण्यांची वेळीच योग्य वेळी पुर्तता होईल याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.