स्मृती भ्रंशामुळे सहा महिन्यांपासून भटकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ६४ वर्षीय व्यक्तीला लाभले पुन्हा घरदार

पोलीस पाटील रविंद्र कोटकर आणि ग्रामस्थ संतोष दाभोळकर यांच्या सामाजिक दायित्वाचे दर्शन

संतोष कोत्रे | लांजा : आंब्याच्या बागेमध्ये काम करणाऱ्या व रस्ता चुकल्याने आणि स्मृती भ्रंशामुळे गावचा पत्ता सांगता येत नसल्याने गेली सहा महिने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरत असलेल्या व्यक्तीला निवारा देणार्या आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन सदर व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देतानाच त्यांच्या प्रवासाची देखील व्यवस्था करून आजही समाजात माणुसकी जीवंत असल्याचे उदाहरण दाखवून दिले आहे ते गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र कोटकर आणि ग्रामस्थ संतोष दाभोळकर यांनी. त्यांच्या या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचे रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील तिसळे (उंडरगाव पोस्ट खरांबोळी येथील रहिवासी असलेले लक्ष्मण सोन्या वाघमारे हे रायगड जिल्ह्यामध्ये एका आंब्याच्या बागेमध्ये कामाला होते. केस कापण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेले असताना ते रस्ता चुकले आणि त्यानंतर त्यांची परवड सुरू झाली. स्वतःचे नाव सोडल्यास त्यांना काहीच आठवत नव्हते. त्यामुळे गेले सहा महिने ते रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाट मिळेल तिकडे भटकत राहिले. फिरत फिरत मुंबई गोवा हायवेने जात असताना लांजा तालुक्यात पोहोचले. त्यानंतर ते एका गुराख्याच्या पाठीमागून गवाणे गवळीवाडी येथे पोहोचले.या व्यक्तीला गवाणे गवळीवाडी येथील ग्रामस्थ संतोष रामचंद्र दाभोळकर यांनी वाटसरू व्यक्ती आपल्या पाठून आल्याची कल्पना गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र उर्फ पिंट्या कोटकर यांना दिली. गवाणे गावचे पोलीस पाटील यांनी या व्यक्तीची नोंद नापता म्हणून पोलीस स्टेशनला आहे का हे बीट अंमलदार श्री नावलेकर साहेब यांच्या सहकार्याने पाहिली.

परंतु या व्यक्तीचे ना पत्ता नोंद नसल्याने ही व्यक्ती कोणत्या गावची आहे याचा शोध घेणे अवघड होऊन बसले होते. तर त्यांच्या राहण्या व खाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तुम्ही शोध घ्या तोपर्यंत मी त्यांचा सांभाळ करतो असे सांगून ग्रामस्थ संतोष दाभोळकर यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली.
सदर व्यक्तीचा शोध कसा घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे एखादा प्रयत्न म्हणून
पोलीस पाटील रविंद्र कोटकर यांनी या व्यक्तीचा फोटो महाराष्ट्र पोलीस पाटील संघ कोकण विभाग या ग्रुप वर टाकला. तो पाहिल्यावर आंबोली मुरुड गावचे पोलीस पाटील अशोक गुंड यांच्याकडून ही व्यक्ती त्यांच्या लगत गावातील तिसळे, उंडरगाव या गावातील असून त्यांचे नाव लक्ष्मण सोन्या वाघमारे असल्याचे सांगितले.त्यांची मुलगी आंबोली मुरुड या गावात दिलेली असल्याने आंबोली मुरुड गावचे पोलीस पाटील अशोक गुंड यांनी त्यांच्याशी गवाणे पोलीस पाटील यांचा संपर्क करून दिला. लक्ष्मण वाघमारे यांची पत्नी अंध आहे.

मुलगा मयत आहे व सून व नातू कामानिमित्त वेगवेगळ्या गावातून फिरत असतात. श्री लक्ष्मण सोन्या वाघमारे हे आदिवासी समाजातील असल्याचे त्यांच्या मुलीकडून समजले. त्यानंतर गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र कोटकर यांनी लक्ष्मण वाघमारे यांची मुलगी विटा मंगेश वालेकर यांना लांजा येथे बोलावून घेऊन लांजा पोलीस ठाणे येथे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण वाघमारे यांना त्यांच्या मुलीच्या ताब्यात दिले. सौ. विटा मंगेश वालेकर यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक राकेश राजा वाघमारे, विकास काशिनाथ वाघमारे हे लांजा येथे आले होते. त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस पाटील रविंद्र कोटकर आणि ग्रामस्थ संतोष दाभोळकर यांनी त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आर्थिक मदत दिली.
अशाप्रकारे पोलीस पाटील रविंद्र कोटकर आणि ग्रामस्थ संतोष दाभोळकर यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे सहा महिन्यांपासून भटकणाऱ्या व आपल्या कुटुंबापासून दूर असणार्या लक्ष्मण सोन्या वाघमारे यांना एकदा त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. त्यांचे गावातून आणि तालुक्यातून या उल्लेखनीय कामाबद्दल कौतुक केले जात आहे.