जुगार खेळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगऱ्यांनी गाठले दाजीपूर

राधानगरी पोलिसांची पडली धाड ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जणांवर गुन्हे दाखल

कणकवली : कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर येथे ऋषिकेश स्टे होममध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती राधानगरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राधानगरी पोलिसांनी ऋषिकेश स्टे होम याठिकाणी छापा टाकला. छाप्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जणांवर कारवाई देखील झाली आहे. तर तब्बल १२ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच भाडे तत्वाने चालवित असलेल्या ऋषिकेश स्टे होम च्या मालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार स्टे होमच्या मालकासह दहा जणांवर जुगार कायदा कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे.

ही कारवाई ३१ डिसेंबर ला संध्याकाळी ५:२० वा.च्या सुमारास दाजीपूर अभयारण्याच्या नजीक असलेल्या ओलवन गावच्या हद्दीमध्ये करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ७२ हजार रुपये रोख, २५ हजार किंमतीचे दोन मोबाईल, १२ लाखाची क्रेटा कार, व पत्ते असा मिळून १२ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक श्री. ओमासे यांनी दिली.

या कारवाईमध्ये किशोर वासुदेव सामंत ( ३४, फोंडाघाट बोकलभाटले ), प्रदीप अर्जुन पाटील ( ४९, माठेवाडा, सावंतवाडी ), प्रकाश दत्तात्रय साळवी ( ३८, फोंडाघाट बाजारपेठ ), आनंद चनाप्पा मेट्टी ( ३८, कुडाळ ), बाळू अशोक बाणे ( ३२ फोंडाघाट झर्येवाडी ), मिलिंद श्रीधर कुबडे ( 45 फोंडाघाट), व स्टे होम चे मालक सागर अनंत खंदारे ( राधानगरी ओलवण ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार काही जण चर्चेत असणारे चेहरे पळण्यात यशस्वी झाले असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोरडीकर, बसरकर यांच्यासह अन्य पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.